Pimpari-Chinchwad : महापालिका इच्छुकांची सोशल मीडियावर एन्ट्री..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:23 IST2025-08-28T12:17:12+5:302025-08-28T12:23:13+5:30
- प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग; पोस्ट्स, रील्स आणि फोटोद्वारे मतदारांशी संवाद जोमात.

Pimpari-Chinchwad : महापालिका इच्छुकांची सोशल मीडियावर एन्ट्री..!
रावेत : महापालिकेच्या प्रभाग रचनेची प्रतीक्षा अखेर संपली असून, एकेकाळी सोशल मीडियावर 'पॉझ मोड' मध्ये गेलेले माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार आता पुन्हा 'अॅक्टिव्ह मोड'मध्ये आले आहेत. निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी प्रभागरचना जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे.
फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि एक्स (द्विटर) सारख्या प्लॅटफॉर्म्सवरून सध्या उमेदवार आपली कामगिरी मांडत आहेत. "पुन्हा संधी द्या", "जनतेच्या सेवेत सदैव तत्पर" अशा घोषणा देत पोस्ट्स, रील्स आणि फोटोद्वारे मतदारांशी संवाद सुरू झाला आहे. काहींनी समर्थकांसाठी विशेष ग्रुप तयार करून त्यातून प्रभागातील समस्या, विकासकामे आणि नियोजन
यांची माहिती देणे सुरू केले आहे.नवीन प्रभाग रचनेमुळे अनेक ठिकाणी दोन विद्यमान नगरसेवक एकाच भागात आल्याने तिकिटासाठी पक्षांतर्गत स्पर्धा रंगली आहे. दुसरीकडे, नागरिकही सोशल मीडियावर सक्रिय झाले असून, थेट उमेदवारांना प्रश्न विचारले जात आहेत "गेल्या पाच वर्षात काय काम केलं?", "पाणी, रस्ते, वाहतूक या समस्या कधी सुटणार?" या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया हॅण्डलर्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोजच्या पोस्ट्स, बॅनर्स, व्हिडीओ तयार करणे, डिझाइन आणि पेड प्रमोशन यासाठी त्यांची दमछाक सुरू आहे.