वाकड : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील रावेत ते बाणेरदरम्यान वाकडजवळील भूमकर चौक, भुजबळ चौक, मुठा नदीवरील पूल परिसरात गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली.
रखडलेले रस्ता रुंदीकरण, मुळा नदीवरील अरुंद पूल, भुजबळ चौक, भूमकर चौक येथील वाढती वाहतूक आणि सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे यामुळे कोंडी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. हिंजवडी आयटी पार्क आणि पुणे-मुंबई महामार्गाला जोडणारा भुजबळ चौक हा महत्त्वाचा दुवा आहे. आयटी हब, औद्योगिक क्षेत्र आणि निवासी वसाहती यामुळे या मार्गावर वाहनांची गर्दी सतत वाढत आहे.
प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉरचा प्रकल्प रखडलेलाच
रावेत ते नऱ्हेदरम्यान २४ किलोमीटरच्या सहापदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरची योजना असून, या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या प्रकल्पाला अद्याप प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. रावेत–वाकडदरम्यान सेवा रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम प्रस्तावित असून, महामार्ग प्राधिकरण व पिंपरी–चिंचवड महापालिका यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया करत आहेत. हे काम रखडलेले आहे.
भुयारी मार्गाचा विस्तार आणि रस्ता रुंदीकरणाचा विलंब
रावेत ते बाणेर मार्गावरील भुयारी मार्गाचा विस्तार आणि रस्ता रुंदीकरणाचा विलंब हीच मोठी समस्या बनली आहे. भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन रुंदीकरण तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. वाहतूक नियोजन सुधारल्यास आणि अडथळे दूर केल्यास कोंडीवर कायमस्वरूपी उपाय मिळू शकतो. तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक कोंडी सुरूच राहणार आहे.या कारणामुळे वाहतूक कोंडी...
भुयारी मार्गालगत असलेली अनधिकृत दुकाने.
अनधिकृत रिक्षा थांबा.
बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या गाड्या.
अवैध खासगी वाहतुकीच्या गाड्यांचा विळखा.
रस्त्यालगत उभे असलेले फळ विक्रेते व त्यांची वाहने.
रस्ता रुंदीकरणाबरोबर विविध उपाययोजना करण्याबाबत वारंवार संबंधित विभागाशी आमचा पाठपुरावा सुरू असतो, मात्र, फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याने येथील कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यांच्याकडून होणाऱ्या संथगती कामाचा फटका वाहतूक व्यवस्थेस बसत आहे. मुठा नदीवरील पुलाचे रुंदीकरण सुरू असून, लवकरच ही कोंडी फुटून वाहतूक सुरळीत होईल. - राहुल सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग
महापालिका हद्दीतील बहुतांश काम आम्ही पूर्ण केले आहे. महामार्गालगत असलेल्या सेवारस्ता रुंदीकरण बाकी आहे. ते भूसंपादनाअभावी राहिले आहे. ज्या ठिकाणी भूसंपादन झाले आहे, त्या ठिकाणी लवकरात लवकर रस्ता रुंदीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. - बापू गायकवाड, सहशहर अभियंता
Web Summary : Traffic jams plague Hinjewadi's Bhumkar & Bhujbal Chowks due to road widening delays, narrow bridges, and encroachments. An elevated corridor project is stalled. Unofficial shops, taxi stands, and parking worsen the chaos. Authorities cite land acquisition issues for delays.
Web Summary : सड़क चौड़ीकरण में देरी, संकीर्ण पुलों और अतिक्रमण के कारण हिंजवडी के भूमकर और भुजबळ चौक पर ट्रैफिक जाम। एलिवेटेड कॉरिडोर परियोजना रुकी हुई है। अनधिकृत दुकानें, टैक्सी स्टैंड और पार्किंग अराजकता को बढ़ाती हैं। अधिकारी देरी के लिए भूमि अधिग्रहण के मुद्दों का हवाला देते हैं।