पिंपरी : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला २००४ मध्ये बहुमत मिळाले होते. त्यात राष्ट्रवादी नंबर वन होती, त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या श्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपद मागून घेतले असते तर छगन भुजबळ किंवा आर. आर. पाटील मुख्यमंत्री असले असते, अशी खदखद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा चिंचवड येथे बोलून दाखवली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री पवार शनिवारी (दि.२३) शहरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, नेहमी म्हटले जाते की, अजित पवार तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आले आहेत. मात्र, हे खोटे आहे. मी कधी कोणाच्या वाट्याला जात नाही; पण आमच्या वाट्याला आलेल्याला मी सोडत नाही. महाराष्ट्राला अजित पवार कोण आहे, हे माहीत आहे. मला राजकारणात येण्याच्या आधी ‘तू थेट बोलणारा आहेस, त्यामुळे तू राजकारणात टिकणार नाहीस’, असे सांगितले जात होते; पण लोकांना माझ्या कामाची पध्दत आवडली. हे जनतेने वारंवार निवडून देऊन सिद्ध केले आहे.