भोसरीतून प्रवाशांची संख्या वाढली; पण पीएमपी बसेस कधी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:29 IST2025-03-25T11:21:26+5:302025-03-25T11:29:48+5:30
- प्रशासनाचा कानाडोळा : बसथांब्यावरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत जाणाऱ्या जादा गाड्या सोडण्याची प्रवाशांची मागणी

भोसरीतून प्रवाशांची संख्या वाढली; पण पीएमपी बसेस कधी वाढणार?
- अंगद राठोडकर
भोसरी : भोसरी पीएमपी बसथांब्यावरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत जाणाऱ्या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. पीएमपी बसची वारंवारता वाढविण्यात यावी, अशी मागणी प्रवाशाकडून होत आहे. मात्र, प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची ऑफर, पण ४ जागांमुळे युती तुटली; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
भोसरी येथील पीएमपी बस थांब्यावरून आळंदी, वाघोली, पुणे स्टेशन, पुणे महापालिका, हडपसर, हिंजवडी, कोथरूड डेपो, वारजे माळवाडी, कात्रज, राजगुरूनगर, म्हाळुंगे, वासुली, तळेगाव येथे गाड्या नियमित ये-जा करतात. यात प्रामुख्याने आळंदीकडे नियमित जाणाऱ्या ६ गाड्या, पुणे स्टेशनकडे १२, वाघोलीकडे जाणाऱ्या सध्या ७ गाड्या सुरू आहेत; परंतु अनेकदा वाहतूक कोंडीमुळे या नियमित वेळेत धावणाऱ्या गाड्या अनेकदा गंतव्यस्थानी वेळेत पोहोचू शकत नाहीत. या मार्गावरील नेहमीच्या प्रवाशांची गर्दी विचारात घेता प्रत्येक ठिकाणच्या बसची संख्या वाढविण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
हडपसरसाठी एकूण १२ गाड्या आहेत, मात्र त्यातील ७ गाड्या बंद आहेत. पुणे स्टेशन १२ गाड्या, हिंजवडीसाठी एकूण १४ गाड्या आहेत. मात्र त्यातील केवळ ५ गाड्या सुरू आहेत. महापालिकेसाठी ११ गाड्या आहेत. मात्र, त्यातील केवळ १० गाड्याच सुरू आहेत. वारजे- माळवाडीसाठी १६ गाड्या आहेत. कात्रजसाठी एकच गाडी आहे. कोथरूड डेपोसाठी ४ गाड्या आहेत, तर राजगुरूनगर या मार्गावर १६, म्हाळुंगे १२, वासुली ५ तर तळेगावसाठी ८ गाड्या नियमित सुरू आहेत.
कधी चार्जिंग नाही तर कधी तांत्रिक बिघाड
ज्या गाड्या आहेत, त्यातील अनेक गाड्या कधी चार्जिंग अभावी तर कधी तांत्रिक बिघाड झाल्याने अचानकच रस्त्यात बंद पडतात. त्यामुळे प्रशासनाने आळंदी, वाघोली, पुणे स्टेशन, महापालिका, कोथरूड डेपो, कात्रज, राजगुरूनगरसारख्या मार्गावरील गाड्यांमध्ये तत्काळ वाढ करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
मी आळंदीत राहतो, भोसरी एमआयडीसी येथे कंपनीत कामाला जातो. वेळेवर बस मिळत नाही, मिळाली तर प्रचंड गर्दी असते. बसची संख्या वाढविण्याची गरज आहे. - प्रफुल्ल माने, कामगार, भोसरी
मी हिंजवडीत एका आयटी कंपनीत कामाल जातो, बस वेळेवर मिळत नसल्याने अनेक वेळा घरी बसावे लागते. - अभिषेक यादव, प्रवासी