...म्हणून माझे आयुष्य संपवतो..! पती - पत्नीने उचलले टोकाचे पाऊल; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:19 IST2025-07-24T18:19:10+5:302025-07-24T18:19:34+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील घटनेमुळे खळबळ

...म्हणून माझे आयुष्य संपवतो..! पती - पत्नीने उचलले टोकाचे पाऊल; नेमकं कारण काय?
पिंपरी : पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे त्याच्याजवळच पत्नी मृतावस्थेत आढळली. या घटनेने पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली. पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. नवी सांगवी येथील शिवनेरी काॅलनी येथे गुरुवारी (दि. २४ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
शाम जग्गू वाघेला (वय ५६) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून, त्यांची पत्नी राजश्री शाम वाघेला (वय ४५) यांचा मृतदेह घरात आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघेला दाम्पत्य नवी सांगवी येथील शिवनेरी काॅलनीतील घरी दोघेच राहत होते. त्यांना दोन विवाहित मुली आहेत. राजश्री वाघेला या पिंपरीगाव येथील शाळेत शिक्षिका होत्या तर शाम वाघेला हे रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या कार्यालयात नोकरी करत होते.
शाम वाघेला हे पत्नी राजश्री यांच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होते. त्यामुळे त्यांच्यात सातत्याने वाद व्हायचे. त्याच कारणावरून बुधवारी (दि. २३ जुलै) रात्री उशिरा दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यावेळी राजश्री वाघेला यांनी आपल्या मुलीला फोन करून याबाबत माहिती दिली होती. ‘उद्या सकाळी येऊन भेटते’, असे मुलीने सांगितले होते.
दरम्यान, गुरुवारी सकाळी मुलगी सांगवी येथे वाघेला यांच्या घरी गेली. घराचा बंद होता. मुलीने दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तिने इतर नातेवाईकांना व शेजाऱ्यांना बोलावले. दरवाजा तोडल्यावर समोरचे दृश्य अंगावर शहारा आणणारे होते. वडिलांनी घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतलेला तर आई मृतावस्थेत आढळली. राजश्री यांच्या तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अहवालानंतर उलगडणार गुढ?
शाम वाघेला आणि राजश्री वाघेला यांचा मृतदेह सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर राजश्री यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
‘..म्हणून माझे आयुष्य संपवत आहे’
शाम वाघेला यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी (सुसाइड नोट) त्यांच्या खिशात मिळून आली. पत्नी राजश्री हिचे अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे, अशा आशयाचा मजकूर चिठ्ठीमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.
शाम वाघेला यांनी गळफास घेतला आहे. त्यांची पत्नी मृतावस्थेत आढळली आहे. ही हत्या आहे की आणखी काही, याबाबत तपास सुरू आहे.
- जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे (पिंपरी-चिंचवड)