शिवसेनेच्या महानगर प्रमुखाची फसवणूक;वैद्यकीय मदतीच्या बहाण्याने ४५ हजारांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 15:47 IST2025-09-20T15:46:29+5:302025-09-20T15:47:15+5:30
फोन करणाऱ्याने ‘‘माझ्या खात्यावर पैसे येत नाहीत, डॉक्टरला त्वरित पैसे पाठवायचे आहेत, तुमच्या खात्यावर घेऊ का?’’ असे सांगून विश्वासात घेतले.

शिवसेनेच्या महानगर प्रमुखाची फसवणूक;वैद्यकीय मदतीच्या बहाण्याने ४५ हजारांचा गंडा
पिंपरी/नेहरूनगर : शिवसेना शिंदे गटाचे पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुख राजेश वाबळे (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांची ४५ हजार रुपयांची फसवणूक झाली. वैद्यकीय मदतीचे कारण सांगून फसवणूक केली. ही घटना मंगळवारी (दि. १६ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
राजेश वाबळे यांनी याप्रकरणी १९३० हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नाेंद केली आहे. वाबळे यांना ९५१९५५०६८९ या मोबाईल क्रमांकावरून ‘काॅल’ आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला शिवसेना सोशल मीडियाचे गणेश शर्मा असल्याचे सांगितले. शर्मा परिचित असल्याने वाबळे यांचा विश्वास बसला. फोन करणाऱ्याने ‘‘माझ्या खात्यावर पैसे येत नाहीत, डॉक्टरला त्वरित पैसे पाठवायचे आहेत, तुमच्या खात्यावर घेऊ का?’’ असे सांगून विश्वासात घेतले. सुरुवातीला दोन रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर ४५ हजार रुपयांचा एसएमएस दाखवून डॉ. कौर यांच्या ९९९६२९१०८३ या मोबाईल क्रमांकावर पैसे पाठवण्यास सांगितले.
वाबळे यांनी प्रथम २० हजार रुपये आणि नंतर आणखी २५ हजार रुपये असे ४५ हजार रुपये संबंधित खात्यावर पाठवले. त्यानंतर पुन्हा ९५ हजार रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज पाठवून अजून पैसे मागितले. त्यानंतर वाबळे यांना संशय आला. त्यांनी त्यांचे खाते तपासले असता पैसे जमा झाले नसल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या खात्यातून पैसे गेले असल्याचे लक्षात आले. घडलेल्या प्रकारानंतर वाबळे यांनी त्यांच्या परिचयातील गणेश शर्मा यांना फोन करून विचारणा केली. अशा प्रकारे फोन करून पैसे मागितले नसल्याचे गणेश शर्मा यांनी सांगितले. त्यानंतर वाबळे यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर १९३० या सायबर हेल्पलाईनवरून तक्रार नोंदवली.