पोलिस वसाहत आहे की, कबुतरखाना? कावेरी पोलिस लाइनमधील घरांमध्ये कबुतर, उंदरांचा त्रास

By नारायण बडगुजर | Updated: July 17, 2025 12:51 IST2025-07-17T12:50:45+5:302025-07-17T12:51:37+5:30

यात वाकड येथील कावेरीनगर वसाहतीतील इमारतींमधील वापराविना असलेल्या घरांमध्ये कबुतरांनी घरटे केले आहे. त्यांच्या विष्ठेने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

pimpari-chinchwad news Pigeons have built nests in unused houses in buildings in Kaveri Nagar Colony, Wakad. | पोलिस वसाहत आहे की, कबुतरखाना? कावेरी पोलिस लाइनमधील घरांमध्ये कबुतर, उंदरांचा त्रास

पोलिस वसाहत आहे की, कबुतरखाना? कावेरी पोलिस लाइनमधील घरांमध्ये कबुतर, उंदरांचा त्रास

पिंपरी : शहरातील पोलिस वसाहतींमधील अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. यात वाकड येथील कावेरीनगर वसाहतीतील इमारतींमधील वापराविना असलेल्या घरांमध्ये कबुतरांनी घरटे केले आहे. त्यांच्या विष्ठेने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कावेरीनगर पोलिस वसाहतीमध्ये चार मजली ३९ इमारती आहेत. यात ३५ इमारती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय, दोन इमारती वायरलेस विभाग आणि दोन इमारती पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या आहेत. या इमारतींमधील ५६० घरांपैकी १५३ घरे वापराविना आहेत. या घरांची दुरवस्था झाली आहे. दरवाजे मोडकळीस आले असून, घरातील प्रत्येक खोलीत कबुतरांनी घाण केली आहे. सर्वत्र कबुतरांची विष्ठा असून दुर्गंधी आहे. त्यामुळे श्वसनाचा त्रास जाणवत असल्याचेही काही रहिवाशांनी सांगितले.

पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते

सध्या पावसाळा असल्याने महापालिकेकडून काही वेळेस गढूळ पाणीपुरवठा होतो. त्यामुळे आम्हाला गेल्या दोन महिन्यांपासून पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सध्या पाण्याची समस्या नसल्याचेही काही रहिवाशांनी सांगितले.

देखभाल दुरुस्तीअभावी इमारती जीर्ण

कावेरीनगरमधील वसाहतीतील इमारती ३५ वर्षे जुन्या आहेत. वेळोवेळी देखभाल दुरुस्ती होत नसल्याने इमारतींची दुरवस्था होत आहे. वापराविना असलेल्या घरांमुळे इमारती जीर्ण होत आहेत, असे रहिवाशांनी सांगितले.

भाडेवाढ केल्याने भुर्दंड

गेल्या वर्षभरापासून या घरांसाठी भाडेवाढ करण्यात आली आहे. तुलनेने तेथे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही भाडेवाढ म्हणजे येथील रहिवासी पोलिसांना भुर्दंड असल्याचे सांगितले जात आहे. 

कचरा उचलणार कोण?

वसाहतीमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. तसेच काही इमारतींचे चेंबर तुंबले आहेत. देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांना स्वत:च चेंबरच्या दुरुस्ती व साफसफाईसाठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

आमच्या स्वयंपाक खोलीतील पाणी खालच्या घरात गळते. त्यामुळे स्वयंपाक खोलीत भांडी धुणे किंवा पाण्याचा वापर करणे शक्य होत नाही. - शालन कोकणे, रहिवासी
 
आमच्या घरातील स्वयंपाक खोलीतील स्लॅब जीर्ण होऊन पडत आहे. वरच्या घरात काही कामकाज होत असल्यास स्लॅबचे सिमेंट पडते. - सखुबाई कांबळे, रहिवासी 
 

आमच्या इमारतीमधील घरांमध्ये छताचे पाणी गळते. भिंतींवरही पाणी येते. पावसाळ्यात ही समस्या अधिक जाणवते. - जीमाबाई चव्हाण, रहिवासी

नियमित साफसफाई होत नाही. बंद घरांमध्ये घाण आहे. तसेच उंदरांचाही मोठ्या प्रमाणात त्रास आहे. - आकाश सोनवणे, रहिवासी

Web Title: pimpari-chinchwad news Pigeons have built nests in unused houses in buildings in Kaveri Nagar Colony, Wakad.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.