Pimpari-Chinchwad : नवी मुंबई महापालिकेच्या जुन्या गाड्यांचा शहरात कचरा संकलनासाठी होणार वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:07 IST2025-08-08T17:01:50+5:302025-08-08T17:07:35+5:30
- शहरातील अनेक भागांमध्ये कचरा उचलण्यास विलंब, कचऱ्याचे ढिगारे रस्त्यांवर पडून

Pimpari-Chinchwad : नवी मुंबई महापालिकेच्या जुन्या गाड्यांचा शहरात कचरा संकलनासाठी होणार वापर
रावेत :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा संकलन यंत्रणेत सध्या मोठा गोंधळ उभा आहे. कचरा संकलनासाठी निवडलेल्या ठेकेदाराने नवी मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या जुने, नादुरुस्त आणि अकार्यक्षम वाहनांचा वापर सुरू केला असल्याचे उघड झाले आहे. परिणामी शहरातील अनेक भागांमध्ये कचरा उचलण्यास विलंब होत असून, कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे रस्त्यांवर साचलेले दिसत आहेत.
कचऱ्यामुळे होणारी दुर्गंधी नागरिकांना त्रस्त केले आहे. नागरिकांकडून महापालिकेवरून कचरा व्यवस्थापनातील ही घुसमट टाळण्याची आणि वेळोवेळी समस्या दुरुस्त करण्याची मागणी जोर पकडली आहे.
पालिकेला त्वरित कठोर पावले उचलून ही गोंधळे लवकरात लवकर दूर करण्याचा मार्ग आखण्याची गरज निर्माण झाली आहे. कचरा संकलनात झालेल्या या प्रकारावर महापालिकेने तत्काळ तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. अन्यथा शहरातील आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने ही समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ठेकेदाराच्या ताफ्यातील सर्व गाड्यांची तत्काळ फिटनेस तपासणी करण्यात येईल. जी वाहने सुस्थितीत नाहीत, त्यांना सेवेतून हटवण्यात येईल आणि संबंधित ठेकेदाराला त्या गाड्या वापरण्यास बंदी घालण्यात येईल. नवी मुंबईऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेसाठी असे वाहनावर बदल करण्याचे आदेश देण्यात येतील. - सुधीर वाघमारे, सहायक आरोग्य अधिकारी, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
कचऱ्याचा ठेका पिंपरी-चिंचवड महापालिकेचा असताना फिटनेस नसलेल्या व वारंवार बंद पडणाऱ्या गाड्यांचा वापर होणे ही शहरवासीयांसाठी धक्कादायक बाब आहे. संबंधित विभागाने ठेकेदाराची सखोल चौकशी करून त्याचा ठेका तत्काळ रद्द करावा. - संदीप भालके, सामाजिक कार्यकर्ते, वाल्हेकरवाडी