‘इंडिगो’चा मावळातील गुलाब उत्पादकांना लाखोंचा फटका;देशभरात जाणारा माल विमानतळावर पडून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:39 IST2025-12-10T13:38:32+5:302025-12-10T13:39:15+5:30
दररोज देशांतर्गत सुमारे ४० लाख गुलाबफुलांची वाहतूक होते. त्यातील २५ टक्के म्हणजे १० लाख गुलाबांची वाहतूक विमानाने होते. मात्र इंडिगोच्या गोंधळामुळे ही फुले विविध विमानतळांवर पडून आहेत.

‘इंडिगो’चा मावळातील गुलाब उत्पादकांना लाखोंचा फटका;देशभरात जाणारा माल विमानतळावर पडून
पवनानगर : इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाल्याने अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. याचा मोठा फटका मावळ तालुक्यातील गुलाबफूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात फुलांची शेती आहे. येथील गुलाबांची निर्यात विविध राज्यांसह परदेशांत केली जाते. दररोज देशांतर्गत सुमारे ४० लाख गुलाबफुलांची वाहतूक होते. त्यातील २५ टक्के म्हणजे १० लाख गुलाबांची वाहतूक विमानाने होते. मात्र इंडिगोच्या गोंधळामुळे ही फुले विविध विमानतळांवर पडून आहेत.
किरकोळ बाजारपेठेत गुलाबाच्या एका फुलाला २० रुपयांचा भाव आहे. सुमारे ५० हजार गुलाबांचे रोजचे १० लाख म्हणजे गेल्या पाच दिवसांत ५० लाखांचा फटका मावळ तालुक्यातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. हे नुकसान कोण भरून देणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या लग्नसराई सुरू असून, या हंगामात फुलांना अधिक मागणी असते. मात्र ‘इंडिगो’च्या विस्कळीत सेवेमुळे गुलाबाची फुले विमानतळावर पडून आहेत.
आमची रोजची एक ते दीड लाख फुले देशभरात जातात. दिल्ली, वाराणसी, लखनौ, गुहवाटी अशा ठिकाणची विमानसेवा रद्द झाल्याने आमचा माल पुणे विमानतळावर पडून आहे. त्या फुलांची किती किंमत मिळेल, हे माहीत नाही. मोठ्या प्रमाणावर फुले खराब झाली आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. - वसंत ठाकरे, फूल उत्पादक कर्मचारी
माझी मावळ तालुक्यात आठ एकरांवर गुलाब शेती आहे. यामधून मला रोज आठ हजार फुले मिळतात. मी इंडिगो एअरलाइन्सने दोन हजार फुले परदेशात पाठवतो; परंतु इंडिगो विमानसेवा बंद पडल्याने येथून पाठवलेली सर्व गुलाबफुले पुणे विमानतळावर पडून आहेत. दररोजच्या दोन हजार गुलाबांचे ४० हजार रुपये असे पाच दिवसांत दोन लाखांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ऑर्डरही रद्द झाल्या आहेत. - आबासाहेब शिवलिंग आळगडे, शेतकरी