पिंपरी : महापालिकेच्या शाळेत विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या ५३ वर्षीय शिक्षकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडूनही कारवाई करण्यात आली आहे. त्याला निलंबित करून त्याची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.संतोष हरिभाऊ बेंद्रे (वय ५३) हा पदवीधर शिक्षक शाळेत सातवीच्या वर्गाला शिकवत होता. अध्यापनाच्या नावाखाली त्याने वर्गातील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचे समोर आले आहे. पालकांच्या तक्रारीनंतर बेंद्रे याच्याविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात पोक्सो कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक झाली आहे.निगडी पोलिसांच्या गुन्हे तपास विभागाने बेंद्रे याला अटक केल्याबाबत महापालिकेला पत्राद्वारे कळविले. हा अहवाल आल्यानंतर पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने त्याच्यावर कारवाई करत त्याला महापालिका सेवेतून निलंबित केले असून खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
अध्यापनाच्या नावाखाली त्याने वर्गातील विद्यार्थिनींसोबत केलं नको ते वर्तन; निगडीतील ‘तो’ शिक्षक अखेर निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 15:16 IST