महायुतीत स्वबळाचे दावे, मविआत एकजुटीची धडपड..! भाजप-राष्ट्रवादीकडून स्वतंत्र लढण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:51 IST2025-09-17T13:51:26+5:302025-09-17T13:51:41+5:30

- काँग्रेस-शिवसेना-शरद पवार गट आघाडीसोबत जागा वाढवण्याच्या प्रयत्नात

pimpari-chinchwad news claims of self-reliance in the grand alliance, struggles for unity in the mva | महायुतीत स्वबळाचे दावे, मविआत एकजुटीची धडपड..! भाजप-राष्ट्रवादीकडून स्वतंत्र लढण्याचे संकेत

महायुतीत स्वबळाचे दावे, मविआत एकजुटीची धडपड..! भाजप-राष्ट्रवादीकडून स्वतंत्र लढण्याचे संकेत

- ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी :
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. प्रभाग रचनेची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत असतानाच राजकीय घडामोडींतही चुरस वाढली आहे. विशेषत: सत्ताधारी महायुतीमध्ये ‘स्वबळावर लढायचे की मित्रपक्षांसोबत?’ या प्रश्नावर विचारमंथन सुरू असून, गोपनीय सर्वेक्षणे, इच्छुकांची चाचपणी आणि गुप्त राजकीय बैठका जोरात सुरू आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडी मात्र एकत्रित लढण्याच्या तयारीत दिसते.

भाजप आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी हे महायुतीतील दोन मोठे खेळाडू. राज्यात एकत्र असले तरी पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक पातळीवर दोघांतील स्पर्धा लपून राहिलेली नाही. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या गडात घुसून तब्बल ७७ जागा मिळवून सत्ता हस्तगत केली होती, तर राष्ट्रवादीला केवळ ३६ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत जर एकत्र लढायचे ठरवले, तर जागावाटपाचा तिढा अपरिहार्य ठरणार आहे.

भाजपकडे स्वतंत्रपणे प्रत्येक प्रभागात पॅनल उभे करण्याची ताकद असल्याचा आत्मविश्वास आहे. राष्ट्रवादीलाही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर जाण्याची इच्छा आहे. दोन्ही पक्षांकडून वरिष्ठ पातळीवर स्पष्ट संदेश गेला आहे. “युती केली तर जागा गमवाव्या लागतील; पण स्वबळावर लढलो तर सत्ता आपल्या हाती राहील.” 

मविआत एकजुटीची धडपड

महाविकास आघाडीत शरद पवार गटाची राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस एकत्रितपणे लढण्याच्या तयारीत आहेत. विधानसभेला तिन्ही जागा शरद पवार गटाने लढवल्या; पण त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ‘एकत्र येऊन महापालिकेत किमान ५०-६० जागा मिळवू’ हा त्यांचा प्रयत्न आहे.

सर्व्हेच्या फेऱ्या आणि गुप्त राजकारण...

दोन्ही आघाड्यांनी शहरात गुप्त सर्वेक्षणे केली आहेत. प्रत्येक प्रभागात किती ताकद आहे, पूर्ण पॅनल उभा करता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या हालचाली, स्थानिक पातळीवरील मतदारसंघातील समीकरणे, ओबीसी-बहुजन मतदारांची ताकद, महिलांचे आरक्षण या सर्व बाबींची बारकाईने तपासणी होत आहे. 

स्थानिक संशयकल्लोळ कायम

वरिष्ठ पातळीवर युतीचा निर्णय झाला तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते तो कितपत मान्य करतील, हा मोठा प्रश्न आहे. कारण, भाजप-राष्ट्रवादीमध्ये अनेक प्रभागांत दोस्तीपेक्षा कटुता अधिक आहे. २०१७ मध्ये भाजप उमेदवारांना हरवण्याचा प्रयत्न करणारे काही नेते आता राष्ट्रवादीत दाखल झाले असून, महायुतीतच आहेत. त्यामुळेच ‘मित्रांपेक्षा शत्रू कमी त्रास देतो’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

उमेदवारी फिक्स म्हणत तयारीला...

प्रभाग रचना अंतिम झालेली नसतानाही काही इच्छुकांनी उमेदवारी जाहीर झाल्याप्रमाणे काम सुरू केले आहे. विशेषतः भाजपमधील आमदार समर्थक कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. “आमदारांनी उमेदवारी फिक्स केली आहे,” असे सांगत ते आपापल्या भागात सभा, मोर्चे आणि बॅनरबाजी करत आहेत. यामुळे अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: pimpari-chinchwad news claims of self-reliance in the grand alliance, struggles for unity in the mva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.