निवडणुका तोंडावर महापालिकेत भाजपने महायुती धर्म तोडला ? राष्ट्रवादी-शिवसेनेतील इच्छुकांचे घेतले अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:48 IST2025-12-11T13:46:16+5:302025-12-11T13:48:34+5:30
- समन्वयाचा अभाव स्पष्ट; पक्षप्रवेश न करताच अर्जांचे वाटप; इतर पक्षांच्या तिकिटावर निवडून येण्याची खात्री नसल्याचा परिणाम; अस्वस्थता वाढली

निवडणुका तोंडावर महापालिकेत भाजपने महायुती धर्म तोडला ? राष्ट्रवादी-शिवसेनेतील इच्छुकांचे घेतले अर्ज
पिंपरी : महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच शहरात महायुती तुटण्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेनेतील (शिंदेसेना) इच्छुकांनीही भाजपचे उमेदवारीचे अर्ज घेतले आहेत. भाजपने पक्षप्रवेश न करताच अर्जांचे वाटप केल्याने भाजपनेच महायुती धर्म तोडला का, असा सवाल राष्ट्रवादी-शिवसेनेकडून केला जात आहे.
महापालिका निवडणुकांची आचारसंहिता कधीही लागू शकते, असा अंदाज असल्यामुळे सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, महायुतीतील पक्षांना भाजप सोडून इतर पक्षांच्या तिकिटावर निवडून येण्याची खात्री नाही. त्यामुळे इतर पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि नव्याने उभे राहत असलेले चेहरे अर्ज भरण्यासाठी भाजपचा पर्याय निवडत आहेत. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदेसेना) यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
वरच्या पातळीवर एकत्र, खाली मात्र गोंधळच गोंधळ
महायुतीचे नेते वरवर समन्वय सुरळीत आहे, असा संदेश देत असले, तरी प्रत्यक्षात स्थानिक कार्यकर्ते मात्र गोंधळात सापडले आहेत. ज्या प्रभागांत महायुतीतील घटक पक्षांची जागा गृहीत धरली गेली होती, त्याच प्रभागांत भाजपचे उमेदवार ‘पहिले आमचे’ असा दावा करताना दिसत आहेत. भाजपची संघटनशक्ती आणि स्थानिक पातळीवरील मजबूत पकड पाहता राष्ट्रवादी–शिवसेनेचे इच्छुक मागे पडत असल्याचे चित्र आहे.
नाराजीची ठिणगी; नेतृत्वाकडे धाव
काही प्रभागांत राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी थेट पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे धाव घेत आहेत. आपल्या वाट्याला आलेल्या जागांवरच भाजपचे उमेदवार उभे होणार असतील तर महायुतीला काय अर्थ आहे, असा सवाल दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते उघडपणे विचारत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये बंद खोलीतील बैठका वाढण्याची शक्यता आहे.
महायुतीची खरी परीक्षा आता
निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यासाठी मोजकेच दिवस उरले असताना जागावाटपाची अंतिम घोषणा आणि अधिकृत उमेदवारांची यादी महायुतीचा भविष्यकालीन आराखडा ठरवणार आहे. मात्र सध्या तरी राष्ट्रवादी–शिवसेनेच्या जागांवर भाजपच्या इच्छुकांची वाढलेली चढाओढ पाहता महायुती धर्माचे पालन होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.