कारण राजकारण : इच्छुकांची रांग वाढली; पक्षश्रेष्ठींची कसोटी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:22 IST2025-10-28T15:21:34+5:302025-10-28T15:22:41+5:30
- चुकीचा उमेदवार निवडल्यास पक्षाला आगामी निवडणुकीत नुकसान होऊ शकते

कारण राजकारण : इच्छुकांची रांग वाढली; पक्षश्रेष्ठींची कसोटी सुरू
- अतुल क्षीरसागर
रावेत : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची रांग दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक प्रभागात दोन ते तीन नव्हे, तर काही ठिकाणी पाच-पाच इच्छुक उमेदवारीसाठी प्रयत्न करत असून, पक्षश्रेष्ठींसमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. कार्यकर्त्यांचा दबाव, गटबाजी, आणि स्थानिक समीकरणे यामुळे पक्षश्रेष्ठींच्या निर्णयकौशल्याची खरी कसोटी लागली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून शहरात उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे. माजी नगरसेवक पुन्हा राजकारणात पुनरागमनाची तयारी करत आहेत, तर नव्या पिढीतील तरुण, व्यावसायिक आणि शिक्षित चेहरेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची उत्सुकता दाखवत आहेत. पक्षांतर्गत गटबाजी, स्थानिक पातळीवरील गणिते आणि शिफारशींचा पाढा पक्षश्रेष्ठींसमोर मांडला जात आहे. काही ठिकाणी अंतर्गत संघर्ष उफाळला असून, नाराज गटाचे सूरही उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींना संतुलन राखत उमेदवार निवड करणे हे मोठे आव्हान ठरले आहे.
निर्णयकौशल्याची कसोटी
प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षश्रेष्ठींवर मोठा ताण आला आहे. कोणाची लोकप्रियता, कोणाची जनसंपर्काची ताकद, तर कोणाचा आर्थिक आणि राजकीय प्रभाव या सर्व गोष्टींचा हिशेब मांडला जात आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे नाराज गटाचे नुकसान पुढील निवडणुकीत भोगावे लागू शकते, हे लक्षात घेऊनच पक्षश्रेष्ठी उमेदवार निवडीत सावध भूमिका घेत आहेत. या सगळ्या समीकरणात संघटनशिस्त टिकवून ठेवत योग्य उमेदवार निवडणे हेच त्यांच्यासाठी खरे नेतृत्व कौशल्य ठरणार आहे.