प्रभाग रचनेच्या हरकतींवर बुधवारी ऑटो क्लस्टरला होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:07 IST2025-09-09T16:06:57+5:302025-09-09T16:07:29+5:30
महापालिकेची फेब्रुवारी २०१७ नंतर आता निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये उत्सुकता

प्रभाग रचनेच्या हरकतींवर बुधवारी ऑटो क्लस्टरला होणार सुनावणी
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभागरचनेला मंजुरी दिल्यानंतर त्यावर चार सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचनांसाठी मुदत दिली होती. मुदतीमध्ये शहरातून ३१८ हरकती दाखल केल्या आहेत. या हरकतींवर बुधवारी (दि. १०) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर याठिकाणी सुनावणी होणार आहे.
महापालिकेची फेब्रुवारी २०१७ नंतर आता निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये उत्सुकता आहे. आयुक्त शेखर सिंहच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या पथकाने प्रभाग रचनेचे नकाशे तयार केले आहेत. त्याला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर ते प्रसिद्ध करण्यात आले. प्रभाग रचना तळवडे-चिखली या भागांपासून सुरू होऊन सांगवी, अशी उतरत्या क्रमाने करण्यात आली आहे.
शहराची २०११ ची जनगणना विचारात घेऊन प्रत्येक प्रभागातील मतदार संख्या निश्चित केली आहे. प्रभागांची रचना सन २०१७ नुसारच केली आहे. यावर शहरातील काही प्रभागांमधून हरकती दाखल आहेत. त्यामध्ये सर्वाधिक हरकती या प्रभाग क्रमांक १० मधून घेण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल प्रभाक क्रमांक १ व २० मधून हरकती नोंदवल्या आहेत. यावेळी एक गठ्ठा हरकती स्वीकारण्यास प्रशासनाने नकार दिला. परिणामी, हरकतींची संख्या कमी झाली आहे. या हरकतींवर बुधवारी ऑटो क्लस्टर याठिकाणी दुपारी एक ते चार या वेळेत सुनावणी घेण्यात येणार आहे.
बुधवारी ऑटो क्लस्टर या ठिकाणी सुनावणी पार पडणार आहे. ज्या नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत. त्यांना सूचनापत्र पाठवण्यात आले आहे. त्यांनी त्या वेळेत हरकतीवरील सुनावणीसाठी उपस्थित राहायचे आहे. - अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग.