महापालिका निवडणुकांच्या तोंडावर इच्छुकांची ‘फ्लेक्सबाजी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:26 IST2025-12-12T15:25:47+5:302025-12-12T15:26:47+5:30
- अवैध फलक हटवताना पथकांची दमछाक; राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या माजी नगरसेवकांना पाठीशी घातल्याचा विरोधकांचा आरोप

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर इच्छुकांची ‘फ्लेक्सबाजी’
पिंपरी : महापालिका निवडणूक जवळ येताच शहरात ‘फ्लेक्सबाजी’ला ऊत आला आहे. माजी नगरसेवक, इच्छुकांनी विनापरवाना फ्लेक्स, किऑक्स व पोस्टर्स लावून शहर विद्रूप केले आहे. वाढदिवस शुभेच्छा, अभिनंदन संदेश, सामाजिक कार्यक्रमांची जाहिरात आणि ‘लवकरच भेटू’ या आशयाच्या राजकीय पोस्टर्सनी चौक, फूटपाथ, झाडे, सार्वजनिक जागांवर कब्जा केला आहे. निवडणूकपूर्व वातावरण तापत असताना ही फ्लेक्सबाजी प्रचंड वेगाने वाढत आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने अवैध फलक हटविण्यासाठी मोहीम राबविली असली तरी पथकांची दमछाक होत आहे. दिवसा काढलेले फ्लेक्स रातोरात पुन्हा उभे राहतात. काही महत्त्वाच्या चौकांमध्ये तर फ्लेक्स लावणे-काढणे याची स्पर्धाच सुरू असून अर्ध्या तासांत चित्र बदलल्याचे दिसते. यामुळे वाहतुकीतही अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान, आगामी निवडणुका लक्षात घेता इच्छुकांची ‘मतदारांना दिसण्याची’ धडपड आणखी तीव्र होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शहरातील अवैध फ्लेक्सबाजी वाढण्याची शक्यता असून महापालिकेला अधिक कडक भूमिका घ्यावी लागणार आहे.
महापालिकेचे पथक विरोधकांचे फ्लेक्स तातडीने हटवते; परंतु राज्यातील सत्ताधारी पक्षांचे माजी नगरसेवक, त्यांचे समर्थक आणि संबंधित गटांचे बॅनर मात्र कायम सोडून दिले जातात, अशा तक्रारी वाढत असल्याने कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट नियमावली दिली असतानाही काही ठिकाणी हे नियम अंमलात आणताना दुटप्पीपणा होत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
एका दिवसात एक लाखांचा दंड
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या पथकांनी शहरभरात धडक कारवाई करीत एका दिवसात ७२४ फ्लेक्स व किऑक्स जप्त केले आहेत. तसेच, एकूण एक लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र, तरीही शहरातील फ्लेक्स कमी होत नसल्याचे चित्र आहे.
दंड, फौजदारी गुन्हे दाखल करणार
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक तसेच, काही संस्था व एजन्सीकडून विनापरवाना फ्लेक्स व किऑक्स लावण्यात येतात. त्यामुळे शहर विद्रूप होत आहे. अपघाताचा धोका वाढला आहे. विनापरवाना फ्लेक्स व किऑक्स, पोस्टर काढून जप्त करण्यात येत आहेत. दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. - राजेश आगळे, उपायुक्त, महापालिका