जिममध्ये वॉर्मअप करताना अचानक कोसळला,हॉस्पिटलमध्ये दाखल करताच ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 14:53 IST2025-08-01T14:50:33+5:302025-08-01T14:53:13+5:30
- घटनेनंतर उपस्थितांनी तातडीने त्यांना जवळील मोरया रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

जिममध्ये वॉर्मअप करताना अचानक कोसळला,हॉस्पिटलमध्ये दाखल करताच ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू
पिंपरी- चिंचवडगावातील नायट्रो जिममध्ये व्यायाम करत असताना मिलिंद कुलकर्णी या ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली. रोजच्या प्रमाणे जिममध्ये आलेल्या मिलिंद यांना व्यायामादरम्यान अचानक भोवळ आली आणि ते जागेवरच कोसळले. घटनेनंतर उपस्थितांनी तातडीने त्यांना जवळील मोरया रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमके कारण जाणून घेण्यासाठी अधिकृत शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.मिलिंद कुलकर्णी हे गेल्या अनेक महिन्यांपासून नियमितपणे नायट्रो जिममध्ये व्यायाम करत होते. आजही त्यांनी वॉर्मअपसह व्यायाम सुरू केला होता.
काही मिनिटांतच त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून, जिम प्रशासनाकडूनही अधिक माहिती घेतली जात आहे.