राज्यातील महापालिकांच्या निवडणुका आधी होतील - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:25 IST2025-12-05T17:25:01+5:302025-12-05T17:25:55+5:30
- २१ किंवा २२ डिसेंबरला आचारसंहिता लागण्याचे सूतोवाच

राज्यातील महापालिकांच्या निवडणुका आधी होतील - चंद्रकांत पाटील
पिंपरी : राज्यातील महापालिकांच्या निवडणुका आधी होतील आणि दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असे मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि.४) व्यक्त केले. येत्या २१ किंवा २२ डिसेंबरला आचारसंहिता लागण्याचे भाकीतही त्यांनी केले.
महापालिका निवडणुकीबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पिंपळे सौदागर येथे पार पडली. त्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची म्हणजे त्यानंतर महायुतीतील पक्ष बसून पुढची दिशा ठरवतील, असा त्यांच्या विधानाचा अर्थ घ्यायला हवा. महापालिकेत महायुती करून लढणार की स्वबळावर याचा सर्वस्वी निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपमध्ये इतर पक्षांतील काही माजी नगरसेवक येण्यास इच्छुक आहेत. कोण निवडून येईल याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत घेतले जाईल. सर्वेक्षण आणि पदाधिकाऱ्यांचे मत ९० ठिकाणी जुळते. दहा ठिकाणी जुळत नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांचे ९० टक्के नावांबाबत एकमत झाले, तर त्यात प्रदेश नेतृत्व कोणताही हस्तक्षेप करणार नाही. प्रदेशकडून अंतिम मान्यता दिली जाईल. उमेदवार निश्चित होताच जाहीर केले जातील, असेही चंद्रकांत पाटील सांगितले.
पार्थ पवारांची अटक चौकशीतील निष्कर्षावर अवलंबून
मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी शीतल तेजवानीला अटक झाली, आता पार्थ पवारांना अटक होणार का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, परसेप्शनवर कोणलाही अटक होत नसते, तर चौकशी समितीच्या निष्कर्षावर ते अवलंबून असते. निष्कर्ष निघाल्यानंतर पुढे तपास यंत्रणा योग्य कार्यवाही करतील.
भाजपकडून इच्छुकांना अर्ज वाटप
चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत निवडणुकीतील इच्छुकांसाठी अर्ज वितरणाची कार्यवाही सुरू करण्यास सांगितले. आगामी पाच दिवसांत इच्छुकांचे अर्ज भरून घ्यावेत. ते अर्ज पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून वितरित केले जावेत आणि या अर्जांचा स्वीकार स्वतः शहराध्यक्षांनी करावा, अशा सूचनाही पाटील यांनी केल्या.