पहा हे स्मार्ट सिटीतील स्मार्ट रस्ते आणि खड्डे ...! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:49 IST2025-11-07T10:46:44+5:302025-11-07T10:49:41+5:30
'ही कसली स्मार्ट सिटी?' 'खड्ड्यांसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा.' 'अधिकारी आणि नेते झोपलेत का?' अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पहा हे स्मार्ट सिटीतील स्मार्ट रस्ते आणि खड्डे ...! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
पिंपरी : स्मार्ट सिटी म्हणून लौकिक असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पाऊस संपला तरी रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत; त्यामुळे सोशल मीडियावर रस्त्यांवरील खड्डे व्हायरल होत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात मार्चपासून पावसाला सुरुवात झाली. जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. नोव्हेंबर आला तरी अधूनमधून पाऊस पडतच आहे. पावसामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील सेवा रस्त्यावर, त्याचबरोबर मुंबई-बंगळुरू महामार्गावरील किवळेपासून ते वाकडपर्यंतच्या सेवा रस्त्यावर, पुणे-नाशिक रस्त्यावरील नाशिक फाटा ते मोशी सेवा रस्त्यावर, रूपीनगर ते तळवडे आणि तळवडे ते आळंदी फाटा रस्त्यापर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.
निगडी ते मोरवाडी या टप्प्यात मेट्रोचे काम सुरू आहे. त्याचबरोबर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सेवारस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. अनेक वेळा खड्डे बुजविले आहेत. मात्र, त्याचा उपयोग झालेला नाही. तात्पुरती डागडुजी केली जात आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
संत तुकारामनगर येथील व्हिडीओ व्हायरल
वल्लभनगर येथे एसटी स्थानक आहे. महामार्ग ते संत तुकारामनगर या रस्त्यावर बसस्थानकासमोरच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. एका खड्ड्यात वाहने अडकल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामध्ये महापालिकेचे एक चारचाकी वाहन तसेच एका व्यक्तीची दुचाकी अडकली आहे. ती गाडी काढण्यासाठी इतर वाहनचालक मदत करत आहेत, असा व्हिडीओ सोशल मीडियावर दिसून येत आहे. त्यावर 'ही कसली स्मार्ट सिटी?' 'खड्ड्यांसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा.' 'अधिकारी आणि नेते झोपलेत का?' अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.