कल्याणी देशपांडेचे गांजा विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त;अकरा किलो गांजासह पती, चुलत जावई आणि पुतणीला अटक

By नारायण बडगुजर | Updated: May 25, 2025 17:29 IST2025-05-25T17:26:11+5:302025-05-25T17:29:43+5:30

बावधन येथील पाषाण-सूस रस्त्यावरील देशपांडे हिच्या कल्याणी कलेक्शन या दुकानात आणि राहत्या घरामध्ये ही कारवाई केली.

pimpari-chinchwad Kalyani Deshpande ganja sale racket busted Husband cousin-in-law and niece arrested with eleven kilos of ganja | कल्याणी देशपांडेचे गांजा विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त;अकरा किलो गांजासह पती, चुलत जावई आणि पुतणीला अटक

कल्याणी देशपांडेचे गांजा विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त;अकरा किलो गांजासह पती, चुलत जावई आणि पुतणीला अटक

पिंपरी : हाय प्रोफाईल वेश्या व्यावसाय प्रकरणी शिक्षा भोगून आलेल्या कल्याणी देशपांडे हिने सुरू केलेले गांजा विक्रीचे रॅकेट पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने उद्ध्वस्त केले. पोलिसांनी छापा मारून देशपांडे हिचा पती, चुलत जावई आणि पुतणीला अटक केली. त्यांच्याकडून २० किलो ७३६ ग्रॅम गांजासह एकूण ११ लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बावधन येथील पाषाण-सूस रस्त्यावरील देशपांडे हिच्या कल्याणी कलेक्शन या दुकानात आणि राहत्या घरामध्ये शनिवारी (२४ मे) सायंकाळी ही कारवाई केली.

कल्याणी देशपांडे हिचा पती उमेश सूर्यकांत देशपांडे (५६, रा. पाषाण-सूस रोड, पुणे), चुलत जावई अभिषेक विकास रानवडे (३२, रा. शनिवार पेठ, पुणे) आणि २२ वर्षीय चुलत पुतणीला पोलिसांनी अटक केली. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी तसेच अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ पथकातील अधिकारी सातत्याने शहरातील अंमली पदार्थ विक्रीवर लक्ष ठेवून असतात. त्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकेही तयार केली आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक विक्रम गायकवाड आणि त्यांचे पथक शनिवारी बावधन येथील पाषाण-सूस रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना गांजा विक्रीबाबत गोपनिय माहिती मिळाली. या रस्त्यावरील कल्याणी उर्फ जयश्री देशपांडे हिच्या कल्याणी कलेक्शन नावाच्या दुकानामध्ये आणि राहत्या घरामध्ये गांजा विक्री सुरू असल्याची खात्रिशीर माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता कल्याणी देशपांडे हिचा पती, चुलत जावई आणि पुतणी या २० किलो गांजासह मिळून आली. पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून २० किलो ७३६ ग्रॅम गांजा, तीन मोबाईल व ७०० रुपये असा एकूण ११ लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

देशपांडेची पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडवर नजर...

कल्याणी देशपांडे हिने काही वर्षांपूर्वी पुण्यात मोठे सेक्स रॅकेट चालविले होते. त्या प्रकरणात शिक्षाही झाली होती. सध्या ती तुरुंगाच्या बाहेर असून पिंपरी-चिंचवड शहरात मोठे अंमली पदार्थ विक्री रॅकेट चालविण्याचा तिचा मानस होता. त्यानुसार तिने गांजा विक्रीचा व्यावसाय सुरू केला होता. आपला पती, चुलत जावई आणि पुतणीच्या मदतीने ती शहरात गांजा विक्री यंत्रणा तयार करण्याच्या तयारीत होती. संशयितांनाही तिनेच गांजा पुरविला होता, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिस पथके रवाना...

गांजा विक्री प्रकरणात कल्याणी देशपांडेचा थेट सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला अटक करण्यासाठी पोलिस रवाना झाले आहेत. हे गांजा विक्री रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले असले तरी स्थानिक पातळीवर गांजा विक्रीसाठी विक्रेत्यांची कोणती साखळी तयार केली होती का, याचा शोधही पोलिस घेत आहेत.

गोपनीय माहितीनुसार पाषाण-सूस रस्त्यावर छापा टाकून कल्याणी देशपांडे हिचे गांजा विक्री रॅकेट उघडकीस आणून उद्ध्वस्त केले. कल्याणी देशपांडे हिने गांजा पुरविल्याचे तपासात समोर आले असून लवकरच कल्याणी देशपांडे हिला अटक करण्यात येईल.  - संतोष पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक

Web Title: pimpari-chinchwad Kalyani Deshpande ganja sale racket busted Husband cousin-in-law and niece arrested with eleven kilos of ganja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.