मला धक्काबुक्की झाली नाही, विरोधकांकडून बदनामीचे षडयंत्र;हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 21:16 IST2025-09-18T21:15:21+5:302025-09-18T21:16:11+5:30
चौकात मिरवणुका आल्यावर काही मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये, मंडळ पुढे जाण्यावरून शाब्दिक वाद झाले

मला धक्काबुक्की झाली नाही, विरोधकांकडून बदनामीचे षडयंत्र;हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांची स्पष्टोक्ती
पिंपरी : विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांत किरकोळ शाब्दिक वाद झाले. सरपंच असल्याने हिंजवडीचा प्रथम नागरिक म्हणून मी मध्यस्थी केली. त्यामुळे तणाव निवळला. मात्र, या घटनेचा विपर्यास करून काही राजकीय विरोधकांनी खोटी माहिती पसरवून संभ्रम निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, अशी स्पष्टोक्ती हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी दिली.
हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी (दि. १८ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. हिंजवडीत ५ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणुका झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुका आल्यावर काही मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये, मंडळ पुढे जाण्यावरून शाब्दिक वाद झाले. त्यावेळी सरपंच गणेश जांभुळकर आणि काहीजणांनी मध्यस्थी करत वाद मिटविला. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी स्वत: गुन्हा दाखल केला. तसेच संबंधित कार्यकर्त्यांना समज देखील दिली.
‘‘राजकीय आकसातून केलेला प्रकार’’
मला धुक्काबुक्की शिझाल्याचे धादांतपणे खोटे सांगण्यात येत आहे. माझ्या काही विरोधकांकडून राजकीय आकसातून चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य आणि मी विकासकामांना प्राधान्य देत आहे. त्यामुळे विराेधकांकडून विकासकामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न होत आहे. आमच्याबाबत गैरसमज पसरवून बदनामी करण्याचा हा कट आहे. आमच्याविरोधात रचलेले हे राजकीय षडयंत्र आहे. माझ्या बदनामीचे षडयंत्र रचणाऱ्यांना कायदेशीर मार्गानेही अद्दल घडविणार आहे, असे सरपंच गणेश जांभूळकर यांनी सांगितले.