Video : खंडाळा बोरघाटात भीषण साखळी अपघात; ९ वाहनांची धडक, सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:46 IST2026-03-26T15:45:44+5:302026-03-26T15:46:50+5:30
एकविरा देवीच्या चैत्री यात्रेमुळे लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली होती.

Video : खंडाळा बोरघाटात भीषण साखळी अपघात; ९ वाहनांची धडक, सुदैवाने जीवितहानी टळली
खंडाळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोरघाटात गुरुवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास भीषण साखळी अपघात घडला. या अपघातात एकामागोमाग आठ ते नऊ वाहनांची धडक होऊन गाड्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यानच व्हिडिओ चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकविरा देवीच्या चैत्री यात्रेमुळे लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली होती. यात्रा संपल्यानंतर भाविक परतीच्या प्रवासाला लागल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेतले जात होते. याचदरम्यान, ब्लॉक सोडताना पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर भरधाव ट्रकने समोरील वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर पुढील वाहनांमध्ये साखळी पद्धतीने धडक होऊन आठ ते नऊ गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिस आणि यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.