भोसरीतील महावितरणजवळ पुन्हा वीजचोरी; कारवाईचे केवळ नाटक ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 19:02 IST2026-04-08T19:02:17+5:302026-04-08T19:02:31+5:30
श्रीराम चौकात काही टपरीधारक आणि दुकानदारांनी रस्त्यावरील डीपी बॉक्समधून धोकादायक पद्धतीने व अनधिकृतपणे वीजजोडणी केली आहे.

भोसरीतील महावितरणजवळ पुन्हा वीजचोरी; कारवाईचे केवळ नाटक ?
- आकाश झगडे
पिंपरी - शहरातील महावितरणाच्या भोसरी-२ उपविभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर श्रीराम चौकात पुन्हा दिवसाढवळ्या वीजचोरी सुरू झाली आहे. काही दिवसापूर्वी 'लोकमत'मध्ये यासंदर्भात बातमी प्रकाशित होताच डीपी बॉक्सला कुलूप लावण्यात आले. मात्र ही कारवाई फक्त दिखावा होता का, येथे महावितरणचे काही 'अर्थ'पूर्ण संबंध आहेत, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
श्रीराम चौकात काही टपरीधारक आणि दुकानदारांनी रस्त्यावरील डीपी बॉक्समधून धोकादायक पद्धतीने व अनधिकृतपणे वीजजोडणी केली आहे. ही यामुळे अनावधानाने कोणी या बॉक्सजवळ गेल्यास विजेचा धक्का लागून अपघात घडू शकतो. या चौकातून गठळी माथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सात ते आठ ठिकाणी डीपी बॉक्सची दारे उघडी आहेत. विशेष म्हणजे याच रस्त्यावर महावितरण उपविभागाचे कार्यालय आहे.
भोसरी याशिवाय पिंपरीतील उड्डाण पुलाखाली भाजीमंडईमध्ये अशाप्रकारे डीपी बॉक्सची दार उघडे असून, त्यातूनही धोकादायक पद्धतीने वीज चोरली जात आहे. दरम्यान, याबाबत महावितरण प्रशासनाला विचारले असता कारवाई होईल, असे उत्तर देण्यात आले. मात्र वारंवार त्याच ठिकाणी असा प्रकार का घडत आहे? याचे उत्तर मिळाले नाही.
वीजचोरी करणाऱ्यांवर पुन्हा कारवाई करणार
त्याच ठिकाणी असा प्रकार होत असल्यास वीजचोरी करणाऱ्यांवर पुन्हा कारवाई होईल, अशी महिती भोसरी महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी दिली.