निळ्या पूररेषेतील जमिनींचे व्यवहार करू नका;महापालिकेचे दुय्यम निबंधक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:41 IST2025-09-26T11:40:58+5:302025-09-26T11:41:41+5:30
महापालिका हद्दीतून जाणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत असलेल्या जमिनींचे कोणतेही व्यवहार करू नयेत

निळ्या पूररेषेतील जमिनींचे व्यवहार करू नका;महापालिकेचे दुय्यम निबंधक
पिंपरी : निळ्या पूररेषेतील जमिनींच्या अनधिकृत खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिका हद्दीतून जाणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत असलेल्या जमिनींचे कोणतेही व्यवहार करू नयेत, असे पत्र महापालिकेने राज्य मुद्रांक आणि नोंदणी विभागास, तसेच सह-दुय्यम निबंधक विभागास पाठवले आहे.
महापालिकेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, निळ्या पूररेषेत येणाऱ्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, दस्तऐवजांची नोंदणी व हस्तांतरण थांबवावेत. शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांच्या निळ्या पूररेषेत जमिनींच्या अनधिकृत व्यवहारांमुळे अतिक्रमण वाढत आहे. अशा जमिनींच्या व्यवहारांवर बंदी आली तर अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणास आळा बसेल, अशी महापालिकेची अपेक्षा आहे. याशिवाय, पालिकेने इंद्रायणी आणि पवना नदीच्या पूररेषेत असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवरही लक्ष केंद्रित केले आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी असल्याचे निदर्शनास आले असून, मागील काही महिन्यांत महापालिका कारवाई करत अनेक बांधकामे तोडली आहेत.
अनधिकृतपणे जमिनींचे व्यवहार होत आहेत. यामुळे अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचेही प्रमाण वाढत आहे. या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार थांबले तर अनधिकृत बांधकामांना आळा बसेल. यामुळे अशा जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत, यासाठी महापालिकेने सहदुय्यम निबंधकांना पत्र दिले आहे. - अतुल पाटील, सहायक आयुक्त, महापालिका