ओला कचरा उचलण्यावरून सोसायट्या आणि ठेकेदारांमध्ये वादावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 10:42 IST2025-04-25T10:42:29+5:302025-04-25T10:42:52+5:30

ओला कचरा उचलण्याचे आदेश असूनही ठेकेदारांकडून अडवणूक, विलगीकरण केलेला कचरा उचलण्यास अडचण नसल्याचे स्पष्टीकरण

pimpari-chinchwad Dispute between societies and contractors over wet waste collection | ओला कचरा उचलण्यावरून सोसायट्या आणि ठेकेदारांमध्ये वादावादी

ओला कचरा उचलण्यावरून सोसायट्या आणि ठेकेदारांमध्ये वादावादी

पिंपरी : शहरातील गृहानिर्माण संस्थांमधील ओला कचरा तिथेच जिरवण्याच्या आदेशाची पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पुन्हा अंमलबजावणी केली जात आहे. तसेच छोट्या सोसायट्यांकडून ओला कचरा उचलण्याची प्रक्रिया थांबविण्यात येणार असून, त्यांचा कचरा त्यानीच जिरवा, असे काही कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांकडून सोसायट्यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका आणि सोसायटीधारकांमध्ये पुन्हा वादावादी होत आहे. दरम्यान, ओला आणि सुका कचरा वेगळा करून दिला तर उचलण्यास काहीही अडचण नाही, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करणे, तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. घर, परिसर, व्यवसाय, आदी ठिकाणी उत्पन्न होणारा ओला, सुका कचरा वेगवेगळा करणे हे कायदेशीर अनिवार्य केले आहे.

सध्या महापालिकेकडून शहराच्या विविध भागातील कचरा गोळा केला जातो. या संदर्भातील परिपत्रक यापूर्वी आयुक्तांनी लागू केले होते. मात्र, गृहनिर्माण संस्थांमधील रहिवासी आणि महापालिका प्रशासन यांच्यात टोकाचा वाद निर्माण झाला होता. लोकांचा विरोध वाढू लागल्याने महापालिकेला हा आदेश मागे घ्यावा लागला. मात्र, तरीही कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांकडून सोसायट्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत.

ओला कचरा सोसायटीतच जिरवा....
सत्तर सदनिका आणि शंभर किलो अथवा त्यापेक्षा अधिक कचरा गोळा होणाऱ्या संस्थांचा ओला कचरा महापालिकेकडून उचलला जाणार नाही. ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. निर्माण झालेल्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करून तो जिरवावा, असे कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांकडून सांगण्यात येत आहे. शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क केला, तेव्हा तो कचरा उचलण्यात आला. - प्रदीप भोळे, रहिवासी, रावेत
 

सोसायट्यांनी त्यांचा कचरा त्यांनीच जिरवावा यासाठी महापालिका आग्रही आहे. मात्र, नवीन गृहनिर्माण सोसायट्या तयार होताना त्यांचे भोगवटा प्रमाणपत्र देताना संबंधित विकसकाला महापालिका कचरा जिरविण्यासाठी सक्षम यंत्रणा बसविण्यासाठी का अडवत नाही ? त्यावेळी योग्य ते नियमांचे पालन केले तर भविष्यात होणारा सोसायट्यांचा त्रास वाचेल. - प्राजक्ता रुद्रावार, सदस्य, रावेत-किवळे सोसायटी फेडरेशन

 
महापालिका छोट्या सोसायट्या, तसेच बैठी घरे यांचा ओला कचरा उचलत आहे. त्यात फक्त ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करावा, अशी एकमेव अट आहे. त्याचे पालन सोसायटी करीत असेल तर कचरा उचलण्यास काहीही अडचण नाही. - सचिन पवार, सहायक आयुक्त, महापालिका. 

Web Title: pimpari-chinchwad Dispute between societies and contractors over wet waste collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.