Pimpari-chinchwad election : भाजपच्या कमळातले ‘काटे’ रूततात कुणाला?

By श्रीनिवास नागे | Updated: August 29, 2025 13:06 IST2025-08-29T13:03:15+5:302025-08-29T13:06:27+5:30

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याबद्दलची नाराजी चव्हाट्यावर येणं म्हणजे ‘कमळदळा’ला ‘काटे’ चांगलेच रूतत असल्याचं पहिलं लक्षण.

pimpari-chinchwad Discontent with city president Shatrughan Kate comes to the fore ahead of the municipal elections | Pimpari-chinchwad election : भाजपच्या कमळातले ‘काटे’ रूततात कुणाला?

Pimpari-chinchwad election : भाजपच्या कमळातले ‘काटे’ रूततात कुणाला?

ऐन गणेशोत्सवात भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर झाली आणि अपेक्षित होतं, तेच घडलं. गटबाजी उफाळली, नव्या उपाध्यक्षांनी राजीनामा दिला. एकानं तर थेट आत्मदहनाचं पत्रक काढलं. काहींनी आणखी काही इशारे दिले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याबद्दलची नाराजी चव्हाट्यावर येणं म्हणजे ‘कमळदळा’ला ‘काटे’ चांगलेच रूतत असल्याचं पहिलं लक्षण.

कोणे एके काळी किरकोळ वाटणारा भाजप पिंपरी - चिंचवड शहरातला बलाढ्य पक्ष बनला. मोदी - फडणवीस पर्वाच्या प्रारंभानंतर ही किमया घडली. महापालिकेत २०१२मध्ये इनमिन तीन नगरसेवक असणाऱ्या या पक्षानं २०१७मध्ये ७७ जागा खिशात घालत सत्तेवरही मांड ठोकली. केंद्र-राज्यातल्या सत्तेमुळं सगळ्या पक्षांतले कार्यकर्ते भाजपचा तंबू जवळ करू लागले. आता शहरात विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे दोन आमदार झालेत. तंबूत शिरलेल्या उंटांनी तंबूच पळवल्याची गोष्ट जुनी झाली. दहा - अकरा वर्षांत बाहेरून आलेली नवी मंडळी हळूहळू जुनी झाली. जुने कारभारी अडगळीत पडले आणि नवे कारभारी ‘नवा अजेंडा’ राबवू लागले.

खरं तर त्यातूनच प्रत्येक नेत्याची महत्त्वाकांक्षा बाळसं धरू लागली. परिणामी पक्षात चार आमदारांचे चार गट, उपगट, उपउपगट केव्हा झाले, हेही कळलं नाही. पण, आमदार महेश लांडगे आणि जगताप गट ‘पॉवरफुल’ बनले. पक्षाची पदं या गटांतच वाटली जाऊ लागली. महेश लांडगे यांच्यानंतर शंकर जगताप शहराध्यक्ष झाले. मात्र, आमदारकीच्या निवडणुकीवेळी जगतापांना शहराध्यक्ष पदावरून बदलण्यासाठी आणि नव्या चेहऱ्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली गेली. त्यासाठी विधानसभेला चिंचवड मतदारसंघातून शंकर जगताप यांना उमेदवारी मिळूच नये, यासाठी वाटेत ‘काटे’ पसरले गेले. तिकिटाच्या स्पर्धेत जी नावं आणली गेली, त्यात शत्रुघ्न काटेही होते. जगतापांच्या रस्त्यातले ‘काटे’ बाजूला करण्यासाठी शहर कार्याध्यक्षपद निर्माण केलं गेलं. त्यावर काटेंना बसवून जगतापांचा मार्ग सुकर केला गेला. मात्र, त्यानंतर जगताप आमदार झाले तरी बरेच दिवस भाजपला शहराध्यक्ष नव्हता. अखेर पक्षातील जगताप विरोधकांनी जुळणी केली. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं ‘मन’ वळवण्यात आलं. बडे व्यावसायिक असलेल्या शत्रुघ्न काटेंची शहराध्यक्षपदी निवड जाहीर झाली. शहरभर फलक झळकले, त्यावर महेश लांडगेंची हसरी छबी ठळ

काटेंनी पदभार घेऊन अवधी उलटला तरी शहर कार्यकारिणीचा पत्ता नव्हता. ‘लवकरच जाहीर करू,’ असं ते सांगत होते. कारण कार्यकारिणीत आपल्या गटाचीच बेगमी करण्यासाठी सगळ्यांचीच रस्सीखेच सुरू होती. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारिणी जाहीर करणं पक्षासाठी गरजेचं होतं. त्यासाठी पुन्हा ‘फिल्डिंग’ लावली गेली. काटेंचे काटे ज्यांना रूतू लागले होते, ते कमळातले काटे अलगद बाजूला करण्याचं ठरलं.

जगतापांच्या गटाचे मोहरे, भोसरी विधानसभा मतदारसंघात लांडगेंना विरोध करणारे शिलेदार यांचा पद्धतशीर काटा काढण्यात आला! कुणाला कार्यकारिणीत संधीच मिळाली नाही, तर कुणाची बढतीच रोखली गेली. परिणाम : नव्या उपाध्यक्षांनी राजीनामा दिला. एकानं आत्मदहनाचं पत्रक काढलं. काहींनी आणखी काही इशारे दिले. अर्थात एवढ्या मोठ्या पक्षात एवढ्या कुरबुरी दिसणारच... पण भाजपचा केव्हाच काँग्रेस पक्ष झालाय, हे मात्र नक्की!

Web Title: pimpari-chinchwad Discontent with city president Shatrughan Kate comes to the fore ahead of the municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.