महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार दारोदारी
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: September 21, 2025 15:36 IST2025-09-21T15:35:40+5:302025-09-21T15:36:40+5:30
- पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दोन दिवस : कार्यकर्त्यांच्या घेणार गाठीभेटी

महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार दारोदारी
- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मैदानात उतरून थेट लोकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे. शनिवारी (दि.२०) पिंपरी विधानसभेत त्यांनी जनसंवाद घेऊन नागरिकांच्या तातडीच्या समस्या ऐकल्या आणि शासकीय यंत्रणेच्या जोरावर त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर पवारांचा ‘परिवार मिलन’ आणि कार्यकर्त्यांच्या घरी भेटीने चर्चांना उधाण आले.
अजित पवार यांच्या या थेट संपर्क मोहिमेमुळे पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीतील निकालांवर या उपक्रमाचा परिणाम कसा दिसून येतो? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तिन्ही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी...
कुठे घरगुती जेवण, कुठे मिसळ-पाव, तर कुठे आइस्क्रीम या माध्यमातून राजकीय सभेपासून दूर जाऊन नागरिकांशी जवळून संवाद साधण्याचा प्रयत्न पवार करत आहेत. चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघांत सलग दोन दिवस पवार घरोघरी भेटी देणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान ऐनवेळी पवारांचा दौरा रद्द झाल्याने हा परिवार मिलनाचा कार्यक्रम ठेवल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
जनता दरबार की अप्रत्यक्ष प्रचाराची रणनीती?
अजित पवारांच्या जनता दरबाराने त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक राजकारणात विशेष ‘लक्ष घातल्या’चे चित्र आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी आयएएस, आयपीएस दर्जाचे अधिकारी मंचावर बसवले, पण निवडणुकीच्या आधी या ‘जनता दरबारातून’ अप्रत्यक्ष प्रचार सुरू केला असल्याची चर्चा होणे साहजिक आहे. कारण, हे व्यासपीठ सर्वपक्षीय असायला हवे होते; प्रत्यक्षात राष्ट्रवादीचेच नेते होते.
भाजपच्या वाटेवर असणाऱ्यांच्याच घरी?
उपमुख्यमंत्र्यांनी ‘परिवार मिलन’चा दौरा शहरभरातील कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याचा ठेवला असला, तरीही यामध्ये विशेषत: भाजपच्या वाटेवर असणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी दादा प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. त्यामुळे या ‘कार्यकर्त्यांचे दादा’ कितपत मन वळवू शकतात, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या माध्यमातून पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चाचपणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दादांचे हे प्रयत्न यशस्वी झाल्यास त्यांच्या पक्षांची महापालिकेत पुन्हा सत्ता येण्यासाठी वेळ लागणार नसल्याची चर्चा आहे.