तुमच्याकडे चहा पिणार नाही म्हटल्याने शेजाऱ्यांची मारहाण
By नारायण बडगुजर | Updated: May 20, 2025 20:42 IST2025-05-20T20:42:21+5:302025-05-20T20:42:47+5:30
ही घटना मावळ तालुक्यातील आंबळे गावात घडली.

तुमच्याकडे चहा पिणार नाही म्हटल्याने शेजाऱ्यांची मारहाण
पिंपरी : जमिनीच्या वादातून तीन जणांनी मिळून शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. ही घटना १६ मे रोजी दुपारी मावळ तालुक्यातील आंबळे गावात घडली.
गौतम जुगदार, प्रथमेश गौतम जुगदार, ऋषिकेश गौतम जुगदार (सर्व रा. आंबळे, मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अमित सयाजी जुगदार (४०, कामशेत) यांनी याप्रकरणी सोमवारी (१९ मे) याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित यांचा ड्रायव्हर शेजारी असलेल्या गौतम जुगदार याच्या घरी बसला होता. त्यामुळे अमित यांनी त्याला आवाज दिला. त्यावेळी गौतम याच्या आईने अमित यांना चहा पिण्यासाठी बोलविले. त्यावर तुम्ही माझी जमीन बळकावली आहे. त्यामुळे मी तुमच्याकडे चहा पिणार नाही, असे अमित यांनी सांगितले. या कारणावरून संशयितांनी अमित यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.