पिंपरी : केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या (सीआरपीएफ) जवानाचा मृतदेह सोमाटणे फाटा येथे आढळला. पोलिसांत अनोळखी मृतदेहप्रकरणी नोंद झाली. मात्र, त्याबाबत माहिती न मिळाल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याबाबत तक्रार केली. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दोन्ही घटनांची नोंद होऊनही पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे जवानाचा मृतदेह तीन दिवस रुग्णालयातच होता. अखेर नातेवाईक आणि मित्रांनी शोध घेतल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.
प्रशांत प्रकाश कदम (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. प्रशांत यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. सीआरपीएफ जवान असलेले प्रशांत कदम गुजरातमधील गांधीनगर येथे कार्यरत होते. ते तळेगाव दाभाडे येथून २५ मार्चला गांधीनगर येथे जाण्यासाठी निघाले. लोकल रेल्वेने ते लोणावळा येथे गेले. तेथून ते लोकल रेल्वेने परत तळेगावकडे आले. मात्र, याबाबत कुटुंबीयांना माहिती नव्हती.
त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दरम्यान, गांधीनगर येथील त्यांच्या कार्यालयाकडून कुटुंबीयांकडे विचारणा झाली. प्रशांत पोहोचले नसल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाइकांनी २७ मार्चला ते बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल केली. सोशल मीडियावरही पोस्ट व्हायरल केली.
दरम्यान, २५ मार्चला रात्री साडेनऊच्या सुमारास सोमाटणे फाटा परिसरात अनोळखी मृतदेह आढळला. तळेगाव दाभाडे पोलिसांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रुग्णालयात नेला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन केले. अनोळखी मृतदेहाबाबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात नोंद केली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वर्णन, फोटो आणि बेपत्ता असलेल्या प्रशांत कदम यांचे वर्णन, फोटो मिळते-जुळते असूनही पोलिसांनी त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला नाही.
रुग्णवाहिका चालकाने पटवली ओळख
प्रशांत कदम बेपत्ता असल्याबाबत सोशल मीडियावरून माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिका चालकाने फोटोवरून त्यांची ओळख पटवली. सोमाटणे फाटा परिसरातून आपल्या रुग्णवाहिकेतनू रुग्णालयात नेलेला मृतदेह प्रशांत यांचाच होता, असे या चालकाने सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी ओळख पटवून सोमवारी (दि. ३० मार्च) मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांकडून हलगर्जीपणा
पोलिसांकडून तपासात गंभीर हलगर्जीपणा झाला आहे. अनोळखी मृतदेह आणि बेपत्ता झाल्याबाबत एकाच पोलिस ठाण्यात नोंद असूनही पोलिसांनी तपास केला नाही. त्यामुळे प्रशांत यांच्याबाबत पोलिसांकडून माहिती मिळाली नाही. दोन-तीन दिवस शोध सुरू असल्याचे सांगितले जात असताना, प्रत्यक्षात तपासात हलगर्जीपणा झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
पित्याचे महत्त्व पटवून देणारा व्हिडीओ
प्रशांत यांनी २५ मार्चला सायंकाळी पत्नीला रील्सचा व्हिडीओ शेअर केला. मुलासाठी पित्याचे महत्त्व किती असते याबाबतचा तो व्हिडीओ होता. तोच अखेरचा मेसेज ठरला.
कुटुंबावर कोसळला दु:खाचा डाेंगर
नातेवाईक व मित्रांनी शोध घेतल्यामुळे मृतदेह वायसीएम रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली. प्रशांत यांचा मृत्यू झाल्याबाबत समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
अपघात की घातपात?
प्रशांत कदम यांचा मृत्यू अपघातामुळे झाला की, हा घातपात होता, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांनी योग्य तपास करावा, अशी मागणी प्रशांत यांच्या नातेवाइकांकडून करण्यात आली आहे.
Web Summary : CRPF soldier's body found near Somatane Phata remained unidentified for three days due to alleged police negligence. Despite a missing person report and similar descriptions, the body wasn't identified until a driver recognized him. Family alleges investigation lapses.
Web Summary : सोमाटणे फाटा के पास सीआरपीएफ जवान का शव मिला, लेकिन कथित पुलिस लापरवाही के कारण तीन दिनों तक पहचान नहीं हो पाई। गुमशुदगी की रिपोर्ट और समान विवरण के बावजूद, एक ड्राइवर द्वारा पहचानने तक शव की पहचान नहीं हो पाई। परिवार ने जांच में चूक का आरोप लगाया।