शंभर रुपयांत घ्या बनावट जन्मदाखला; रॅकेटची देशभरात ऑनलाइन दुकानदारी
By नारायण बडगुजर | Updated: October 8, 2025 10:08 IST2025-10-08T10:07:46+5:302025-10-08T10:08:14+5:30
संकेतस्थळावरून सहज मिळतो दाखला : लाखो नागरिकांसह शासनाचीही फसवणूक, देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत बनावटगिरीचे जाळे; शासकीय प्रमाणपत्र, विविध दाखले आणि इतर सरकारी दस्तावेजांचीही विश्वसनीयता धोक्यात

शंभर रुपयांत घ्या बनावट जन्मदाखला; रॅकेटची देशभरात ऑनलाइन दुकानदारी
पिंपरी : ऑनलाइन पद्धतीने केवळ शंभर रुपयांमध्ये बनावट जन्मदाखला देण्याचा प्रकार समोर आला आहे. संकेतस्थळावरून बनावट दाखला सहज उपलब्ध करून देणारे हे रॅकेट देशभरात नागरिकांची आणि शासनाची फसवणूक करत आहे. त्यातून शासकीय प्रमाणपत्र, विविध दाखले आणि इतर सरकारी दस्तावेजांचीही विश्वसनीयता धोक्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील आधार सेवा केंद्रावर बेकायदेशीररीत्या आधार कार्ड अपडेटचा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. पोलिसांना तेथे बनावट आणि एकाच व्यक्तीचे दोन-दोन जन्मदाखले आढळून आले. त्यावर क्यूआर कोड होता. ते जन्मदाखले ऑनलाइन पद्धतीने काढले होते. शासनाकडून देण्यात येणाऱ्या दाखल्यांसारखेच ते होते. त्यावरील क्यूआर कोड स्कॅन होऊन आवश्यक माहिती दर्शविण्यात येत होती. त्यामुळे हे दाखले बनावट असल्याचे सहज लक्षात येत नाही. एका संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने १०० रुपये पाठवल्यानंतर काही वेळातच अशा पद्धतीचे बनावट जन्मदाखले तयार करून दिले जातात. हे रॅकेट देशभरात नागरिकांची आणि शासनाची फसवणूक करत आहे.
आधार कार्डसाठी बनावट जन्मदाखले
आधार कार्ड दुरुस्ती किंवा अद्ययावत करण्यासाठी क्यूआर कोड असलेला जन्मदाखला आवश्यक असतो. तो सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे बनावट जन्मदाखला घेतला जातो. हे दाखले देण्यासाठी ऑनलाइन रॅकेट कार्यरत आहे.
किती जणांनी घेतले दाखले?
संबंधित संकेतस्थळावरून किती जणांनी दाखले घेतले, किती जणांनी संकेतस्थळावर पैसे पाठवले, जन्मदाखल्यांसह आणखी कोणते बनावट दाखले किंवा प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे देण्यात आली आहेत, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
कारवाईनंतरही ‘उद्योग’ सुरूच
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी एकावर कारवाई केली होती. त्याने पुन्हा बोगस कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड अपडेट करून देण्याचा प्रकार सुरू केला. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी बोऱ्हाडेवाडी परिसरातील आधार सेवा केंद्रावर कारवाई केली.
एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा
भोसरी एमआयडीसी परिसरातील बोऱ्हाडेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील आधार सेवा केंद्रावर बेकायदेशीररीत्या आधार कार्ड अपडेट करण्याचा प्रकार सुरू होता. तेथील ऑपरेटर बाळू शिवाजी चांदोडे (३२, रा. डोळस वस्ती, भोसरी गावठाण), शिवराज प्रकाश चांभारे (४२, रा. भोसरी) आणि त्यांच्यासह एका अनोळखीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बाळू चांदोडे बनावट जन्मदाखल्यांच्या आधारे आधार कार्डांमध्ये अनधिकृत बदल करीत असल्याचे आढळून आले. त्याला शिवराज चांभारे याने बनावट जन्मदाखले उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात बनावट जन्म प्रमाणपत्रे, नमुना अर्ज, संगणक उपकरणे, मोबाइल फोन आणि रोख रकमेचा समावेश आहे.