”तयार राहा, गोळी कुठूनही येऊ शकते”, गोल्डन मॅन सनी वाघचौरेला लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून ५ कोटींच्या खंडणीची धमकी
By किरण शिंदे | Updated: January 30, 2026 16:26 IST2026-01-30T16:25:15+5:302026-01-30T16:26:35+5:30
- मी बिष्णोई गॅंगमधून शुभम लोणकर बोलतोय. तू कोणालाही विचार, गुगल सर्च कर, बिष्णोई गॅंग कोण आहे. बाकी तुला मेसेजवर बोलतो असे सांगत फोन कट केला.

”तयार राहा, गोळी कुठूनही येऊ शकते”, गोल्डन मॅन सनी वाघचौरेला लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून ५ कोटींच्या खंडणीची धमकी
पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. गोल्डन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनी वाघचौरे या तरुणाला लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. इतकच नाही तर ५ दिवसात खंडणीची रक्कम न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी सनी वाघचौरे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली असून, शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, २५ जानेवारी रोजी सनी वाघचौरे यांच्या मोबाईलवर कॅनडातील एका क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला. हा कॉल उचलताच समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने, “मी बिष्णोई गॅंगमधून शुभम लोणकर बोलतोय. तू कोणालाही विचार, गुगल सर्च कर, बिष्णोई गॅंग कोण आहे. बाकी तुला मेसेजवर बोलतो,” असे सांगत फोन कट केला.
यानंतर २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास, कॅनडातील एका क्रमांकावरून सनी वाघचौरे यांच्या मोबाईलवर थेट धमकीचा मेसेज आला. या मेसेजमध्ये, “राम राम, मैं शुभम लोणकर लॉरेन्स बिष्णोई ग्रुप से. मेरा पता कर लेना. तुझ्याकडून ५ कोटी हवेत. सनी, पळालास तरी तुला जगातली कोणतीही ताकद वाचवू शकणार नाही. तुला ५ दिवसांचा वेळ आहे. तयार राहा, गोळी कुठूनही येऊ शकते. जर तुझा रिप्लाय आला नाही तर बाबा सिद्दिकीसारखे तुझे हाल करू. आणि जितकं सोनं तू घालतोस ना, त्यापेक्षा जास्त पितळ भरू… लक्षात ठेव , आरजू बिष्णोई,” असा मेसेज पाठवण्यात आला आहे.
या धमकीनंतर सनी वाघचौरे यांनी तातडीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात धाव घेत संपूर्ण प्रकाराची माहिती देत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने तपास सुरू केला आहे. संबंधित मोबाईल क्रमांक, व्हॉट्सॲप कॉल, मेसेजेस याची माहिती घेतली जात आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.