पिंपरी : बंद घरामध्ये चार ते पाच दिवसांचा कुजलेला मृतदेह मिळून आला. पिंपरीतील नेहरुनगर येथे शुक्रवारी (दि. २१ मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
समीर बाळकृष्ण शेलार (४१, रा. प्रज्वल हाउसिंग सोसायटी, नेहरुनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेलार यांची पत्नी त्यांना सोडून गेली आहे. समीर हे त्यांच्या घरात एकटेच राहत होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे नातेवाईकांनी डायल ११२ या क्रमांकावर माहिती दिली. त्यानंतर संत तुकाराम नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
समीर यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी समीर यांचा मृतदेह आढळून आला. पिंपरी येथील यशंवतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. व्हिसेरा राखून ठेवला आहे.