निवडणुकीत खर्चमर्यादा वाढविल्याने सामान्य इच्छुक उमेदवारांमध्ये चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:56 IST2025-10-31T13:55:35+5:302025-10-31T13:56:22+5:30
- महापालिका निवडणुकीत १३ लाखांच्या मर्यादेचा निर्णय श्रीमंत उमेदवारांच्या पथ्यावर पडणार का?, सामान्य इच्छुकांपुढे अडथळ्यांचा डोंगर, निवडणुकीत आर्थिकदृष्ट्या सबळ उमेदवाराशी स्पर्धा करणे अधिक कठीण होणार

निवडणुकीत खर्चमर्यादा वाढविल्याने सामान्य इच्छुक उमेदवारांमध्ये चिंता
- अतुल क्षीरसागर
रावेत : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नगरसेवक पदासाठीच्या खर्चाची मर्यादा १० लाखांवरून थेट १३ लाख रुपये केली आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय गोटात आनंद, पण सामान्य इच्छुकांमध्ये चिंता आहे.
आयोगाने दिलेल्या कारणांनुसार, प्रचार साधनांचा वाढता खर्च, सोशल मीडियाची व्याप्ती आणि महागाई लक्षात घेऊन ही मर्यादा वाढविण्यात आली आहे. मात्र, राजकीय वर्तुळात या निर्णयावर मतभेद आहेत. काहींचे मत आहे की, हा निर्णय श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सबळ इच्छुकांसाठीच अनुकूल आहे. सामान्य उमेदवारांची निवडणुकीतील स्पर्धा आता अधिक कठीण होणार आहे. कारण आर्थिकदृष्ट्या सबळ उमेदवार अधिक खर्च करू शकणार आहेत, परंतु सामान्य इच्छुक उमेदवार तितका अधिक खर्च करू शकणार नाहीत.
निवडणुकीत प्रचार वाहन, बॅनर, होर्डिंग्ज, जनसंपर्क सभा, स्नेहभोजन तसेच डिजिटल जाहिरातींवर प्रचंड खर्च होतो. त्यामुळे ज्या उमेदवारांकडे आर्थिक पाठबळ आहे त्यांना मोठा फायदा होणार अशी सर्वसाधारण चर्चा आहे.
श्रीमंत उमेदवारांना नवसंजीवनी....
महापालिकेच्या १२८ प्रभागांपैकी प्रत्येक प्रभागात मतदारसंख्या मोठी आहे. १३ लाखांपर्यंत खर्च करण्याची मुभा मिळाल्याने प्रचार अधिक भव्य करता येईल असे काही प्रस्थापित उमेदवारांचे मत आहे. त्याचबरोबर पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीनेही हा निर्णय सोयीचा ठरणार आहे. कारण, श्रीमंत इच्छुक प्रचार स्वतःच्या पैशांवर चालवू शकतात, त्यामुळे पक्षाच्या खिशावर ताण कमी येतो.
सामान्य इच्छुकांच्या मनात अस्वस्थता
पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, मध्यमवर्गीय व्यावसायिक आणि तरुणांनी आगामी निवडणुकीत उमेदवारीची तयारी केली होती. मात्र, खर्चमर्यादा वाढल्यानंतर त्यांची चिंता वाढली आहे. जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे, पण आता खर्चाच्या मर्यादेमुळे उमेदवारीच आवाक्याबाहेर गेली आहे, अशी भावना एका इच्छुक सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केली. 
निवडणूक आयोगाची अडचण पारदर्शकता राखावी कशी?
खर्चमर्यादा वाढवल्याने उमेदवारांकडून होणाऱ्या गुप्त खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रचार काळात उमेदवाराकडून होणाऱ्या रोखीतील व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे अवघड असते. यामुळे आयोगासमोर पारदर्शकतेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पक्षश्रेष्ठींची कोंडी आणि गोटातील हालचाली...
प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची रांग लागली आहे. खर्चमर्यादा वाढल्याने पक्षश्रेष्ठीदेखील आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रभावशाली उमेदवारांनाच प्राधान्य देतील, अशी शक्यता आहे. यामुळे ‘काम करणाऱ्यापेक्षा, खर्च करणाऱ्याला संधी’ ही भावना पक्षातील तळागाळात वाढताना दिसते.