कारण राजकारण: 'गावकी-भावकी' फॅक्टर महापालिका निवडणुकीत यंदाही ठरणार निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 14:09 IST2025-10-31T14:09:22+5:302025-10-31T14:09:50+5:30
- पक्ष चिन्हाइतकीच स्थानिक ओळख महत्त्वाची ठरणार : वैयक्तिक ओळख, सामाजिक गट आणि नातेसंबंधांच्या आधारे मतदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी, राजकीय पक्षांची उमेदवारीसाठी परीक्षा

कारण राजकारण: 'गावकी-भावकी' फॅक्टर महापालिका निवडणुकीत यंदाही ठरणार निर्णायक
- महादेव मासाळ
पिंपळे गुरव : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांमध्ये 'गावकी-भावकी'चा घटक पुन्हा एकदा ठळकपणे डोकावू लागला आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या परिसरातील मतदारांशी संवाद वाढवण्यास सुरुवात केली असून, नातेसंबंध व ओळखीच्या आधारावर मतदारसंघात मते एकवटण्याची चढाओढ सुरू झाली आहे.
गावकी-भावकी ही भावना आपल्या समाजाच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. पूर्वी ती आपलेपण जपणारी होती, परंतु आता ती राजकीय मतभेद आणि गटबाजीचे साधन बनत चालली आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये हे घटक अधिक प्रभावी दिसतात. कुठल्याही पक्षाच्या उमेदवारीपेक्षा गाव, समाज किंवा आपली ओळख या नात्यावर लोक मतदान करत असल्याने राजकारणी मंडळीही उमेदवारी देताना या समीकरणांचा तौलनिक विचार करताना दिसून येत आहेत.
स्थानिक राजकारणात गेल्या काही निवडणुकांपासूनच गावकी-भावकी हा घटक प्रभावी ठरला असून, मतदारांमध्ये वैयक्तिक ओळख, सामाजिक गट आणि नातेसंबंधांच्या आधारे मतदानाचे चित्र दिसून आले आहे. आगामी निवडणुकीतही हीच पार्श्वभूमी दिसत असून, स्थानिक मतदारसंघातील जुने संबंध, गावचा गट आणि सामाजिक बंध हीच उमेदवारांसाठी विजयाची गुरुकिल्ली ठरू शकतात.
अनेक इच्छुक रांगेत असल्याने कसोटी
पक्षांतर्गत पातळीवरही उमेदवारी ठरवताना या गावकी-भावकी समीकरणांचा विचार करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. काही प्रभागांत एकाच गावातील अनेक इच्छुक रांगेत आहेत.
पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी
प्रभागनिहाय पाहता अनेक ठिकाणी एकच समाज, गाव किंवा भावकीतून अनेक इच्छुक पुढे येत आहेत. काही ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांचा आग्रह तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांचा दबाव निर्माण होत आहे. भावनिक नाती आणि सामाजिक समीकरणे उमेदवारी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने पक्षश्रेष्ठींना संतुलन साधत निर्णय घ्यावा लागणार आहे.