रस्ते उभारणारे इंजिनिअर आहेत की, यमाचे दूत? पिंपरीत धोकादायक गतिरोधकांचा कहर; नागरिक संतप्त
By नारायण बडगुजर | Updated: February 17, 2026 09:28 IST2026-02-17T09:25:30+5:302026-02-17T09:28:20+5:30
- गतिरोधकाच्या नावाखाली रस्त्यांवर तयार केले जात आहेत उंचवटे : महापालिका प्रशासनाकडून मनमानी पद्धतीने उभारणी

रस्ते उभारणारे इंजिनिअर आहेत की, यमाचे दूत? पिंपरीत धोकादायक गतिरोधकांचा कहर; नागरिक संतप्त
पिंपरी : अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच शहरात अनधिकृत आणि अशास्त्रोक्त पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या धोकादायक गतिरोधकांकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. उलट, प्रशासनाकडूनच मनमानी पद्धतीने गतिरोधक तयार करून दिले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या धोकादायक उंचवट्यांमुळे वाहनांचे नुकसान तर होतेच, शिवाय वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे ‘रस्ते उभारणारे इंजिनिअर आहेत की यमाचे दूत?’ असा संतप्त सवाल शहरवासीय करत आहेत.
अशास्त्रीय व अनधिकृत गतिरोधक हटवण्यात यावेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी दिले होते. न्यायालयाने स्पष्ट केले होते की, इंडियन रोड्स काँग्रेस (आयआरसी) यांच्या मानकांनुसार आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार आवश्यक तेथेच शास्त्रोक्त पद्धतीने गतिरोधक उभारावेत. त्यानंतर शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील अनेक गतिरोधक हटवण्यात आले होते. मात्र, गेल्या वर्षभरात पुन्हा नव्याने अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून धोकादायक उंचवटे तयार करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
अनेक ठिकाणी डांबराचे उंचवटे केले आहेत. काही ठिकाणी पादचारी मार्गासारखे सिमेंटचे गट्टू ठेवून एक ते दीड फूट उंचीचे उंचवटे बनवले आहेत. या उंचवट्यांवर वाहने धडकत असून, उंचवटा ओलांडल्यानंतर वाहन खड्ड्यात आदळल्यासारखा धक्का बसतो. परिणामी वाहनांचे मोठे नुकसान होते. तसेच वाहनचालकांना कंबरदुखी, पाठदुखी यांसारख्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने सर्व गतिरोधकांची पाहणी करून नियमबाह्य उंचवटे हटवावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
नवीन रस्त्यावर गतिरोधक
पिंपरीगावातील पिंपळे सौदागर मार्गावर म्हाडा इमारतींसमोर नव्या काँक्रीट रस्त्यावर धोकादायक उंचवटे तयार केले आहेत. काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी अशाच उंचवट्यावर वाहन आदळून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गतिरोधक हटवला होता. मात्र, पुन्हा गतिरोधकासारखे धोकादायक उंचवटे उभारल्याने संताप व्यक्त होत आहे. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयासमोरही डांबराचा मोठा उंचवटा तयार केला आहे.
बीआरटी मार्गावर धोका
काळेवाडी फाटा ते केएसबी चौकादरम्यान बीआरटी मार्गावरही धोकादायक गतिरोधक उभारले आहेत. या मार्गावर काळेवाडीत नढे कॉर्नर, चिंचवड येथील ऑटो क्लस्टर परिसर आणि नवीन चौकात अशाच प्रकारचे धोकादायक गतिरोधक आहेत. निगडीतील भक्तीशक्ती चौक ते त्रिवेणीनगर चौकदरम्यान स्पाइन रस्त्यावरील गतिरोधक अपघाताला निमंत्रण देत आहेत. आकुर्डीतील खंडोबामाळ चौक ते थरमॅक्स चौकादरम्यानही हीच स्थिती आहे.
रस्त्यांसाठी गतिरोधक की, गतिरोधकांसाठी रस्ते?
रुपीनगरमधील अंतर्गत रस्त्यांवर ५० ते १०० फुटांवर गतिरोधक असल्याने वाहन चालवण्याची कसरत करावी लागते. ‘रस्त्यांसाठी गतिरोधक की गतिरोधकांसाठी रस्ते?’ असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. चिंचवड, भोसरी आणि पिंपरी एमआयडीसी परिसरातही अनधिकृत गतिरोधकांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.