किन्हई गावात बिबट्या आला..रे..आला...! गावातील शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 12:19 IST2025-04-12T12:18:04+5:302025-04-12T12:19:33+5:30

शेतीकामासाठी महिलाचा नकार; भाजीपाला, शेतमाल काढण्यासाठी धजावत नसल्याने शेतकरी चिंतातुर 

pimpari-chinchwad A leopard came to Kinhai village the farmers of the village were in a panic | किन्हई गावात बिबट्या आला..रे..आला...! गावातील शेतकरी हवालदिल

किन्हई गावात बिबट्या आला..रे..आला...! गावातील शेतकरी हवालदिल

देहूगाव : किन्हई गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली आहे. मागील आठवड्यात (दि. २) या बिबट्याने एका वासरावर हल्ला केला होता. त्यानंतर गुरुवारी (दि. १०) पहाटे एका कुत्र्यावर हल्ला करून जखमी केले. यामुळे संपूर्ण गावातील शेतकरी बांधव भीतीने हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतात कामे करण्यासाठी महिलावर्ग तयार नाहीत. शेतातील कांदे काढणी, बाजरी काढणी, चारा काढणे व शेतातील इतर भाजीपाला व शेतमाल काढण्यासाठी धजावत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. किन्हई परिसर हा लष्करी हद्दीला लागून असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी आहे. इंद्रायणी नदी वाहत असल्याने मुबलक पाणी आहे. यामुळे शेतात उसाचे पीक, मका, बाजरी यांसारखी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.
 

येथील शेतकरी गुलाब पिंजण यांच्या शेतात बांधलेल्या वासरावर रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून त्याला फस्त केले. दरम्यानच्या काळात वन विभागाच्या मदतीने या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. येथील शेतकरी दत्ता पिंजण यांच्या घरापुढे बांधलेल्या कुत्र्यावर त्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली. मच्छिंद्र पिंजण यांच्या शेतात या बिबट्याच्या पायांचे ठसे आढळले आहेत. तसेच गुरुवारी सुहास पिंजण हे सकाळी ११ वाजता शेतात पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्या दिसून आला.

मागील आठ वर्षांपासून सतत या भागात बिबट्याचा वावर आहे. प्रतिवर्षी या भागात बिबट्या दिसून येतो. या बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा. - संजय पिंजण, माजी नगरसेवक, देहूरोड कॅन्टोन्मेंट  

पूर्वीपासूनच या गावात बिबट्याचा वावर आहे. मात्र अलीकडे झाडी कमी होऊन सिमेंटच्या इमारती झाल्या आहेत. त्यामुळे बिबट्या वारंवार दिसून येत आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे बिबट्या बाहेर पडण्याच्या वेळेपूर्वी बंदिस्त करून गोठ्यात ठेवावीत. ग्रामस्थांनी यासाठी सहकार्य करून सूचनांचे पालन केले तर बिबट्यापासून आपली सुटका होऊ शकेल. पिंजरा लावणे हा यासाठी अंतिम उपाय नाही. - रितेश साठे, संस्थापक - स्केल ॲण्ड टेल्स

Web Title: pimpari-chinchwad A leopard came to Kinhai village the farmers of the village were in a panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.