पिंपरी : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गडावर भाजपने पुन्हा एकदा झेंडा रोवला. अत्यंत प्रतिष्ठेच्या दुरंगी लढतीत त्यांनी एकत्र आलेल्या दोन्ही राष्ट्रवादीला पाणी पाजले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपविरोधात रान पेटवूनही राष्ट्रवादीला यश मिळाले नाही. पवार यांनी केलेला भाजपच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा निष्प्रभ ठरला. पालिकेतील १२८ पैकी तब्बल ८४ जागा भाजपने खिशात घातल्या. राष्ट्रवादीला ३७, शिंदेसेनेला ६ जागा मिळाल्या, तर एक अपक्ष निवडून आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी निश्चिती ते प्रचारापर्यंत भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) आघाडीवर होते. राष्ट्रवादी (अजित पवार)ने शरद पवार गटाशी हातमिळवणी केली होती. भाजपच्या मागील सत्ताकाळातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अजित पवारांनी भाजपला घेरले होते. मात्र, दुसरीकडे उमेदवारी जाहीर करण्याच्या तोंडावर २२ शिलेदारांनी पवारांची साथ सोडली. भाजपने शंभराचा आकडा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवून मोर्चेबांधणी केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी, शिंदेसेना व इतर पक्षांतील मोहरे फोडण्याचा सपाटा लावला. अजित पवार यांनीही तोच कित्ता गिरवत भाजपमधील काही नाराजांना उमेदवारी दिली. भाजप-राष्ट्रवादीने शिंदेसेनेशी युती करण्याबाबत मात्र शेवटपर्यंत ‘सस्पेन्स’ ठेवला. त्यामुळे बंडखोरीचे प्रमाण कमी झाले.
काँग्रेस, उद्धवसेना-मनसे, आप, वंचित बहुजन आघाडी, सनय छत्रपती शासन यांनीही उमेदवार उभे केले होते. मात्र, हे पक्ष नेस्तनाबूत झाले.भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्या सभा झाल्या, तर राष्ट्रवादीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी (शरद पवार)चे खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार यांच्या सभा झाल्या. शिंदेसेनेची खिंड खासदार श्रीरंग बारणे यांनी लढविली.
दोन्ही राष्ट्रवादीत गोंधळ
जागावाटपाबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना राष्ट्रवादी (अजित पवार)च्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार)च्या नेत्यांना विश्वासात घेतले नाही. चर्चेचे गुऱ्हाळ लांबवले व अखेरीस अनेक प्रभागांमध्ये उमेदवार देत मैत्रीपूर्ण लढती केल्या. त्यामुळे दोन्ही गटांना फटका बसला.
नेता एकटाच लढला!
महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अजित पवार एकटेच लढत होते, तर त्यांचे स्थानिक पातळीवरील शिलेदार तोंडावर बोट ठेवून होते. त्यामुळेही अपेक्षित यश मिळाले नाही. दुसरीकडे मागील वेळी ७७ वर असणारे भाजपचे संख्याबळ ८३ वर जाऊन पोहोचले. अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा विकासाचा मुद्दा लावून धरल्याने अपेक्षित यश मिळवण्यात भाजपला यश मिळाले आहे.
नितीन काळजे यांना सर्वाधिक, सविता आसवाणींना सर्वांत कमी मताधिक्य
प्रभाग १९ मधील भाजपच्या जयश्री गावडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सविता आसवाणी केवळ २१ मतांनी विजयी झाल्या, तर प्रभाग ३ मधून भाजपचे नितीन काळजे यांनी सर्वाधिक १९ हजार ६५३ मताधिक्य घेऊन राष्ट्रवादीच्या प्रकाश आल्हाट यांचा पराभव केला.
Web Summary : BJP retained Pimpri-Chinchwad, securing 84 of 128 seats despite Ajit Pawar's campaign focusing on alleged corruption. Nationalist Congress Party (NCP) won 37 seats. Internal conflicts within NCP and BJP's development focus contributed to the outcome.
Web Summary : भाजपने पिंपरी-चिंचवड राखले, अजित पवारांच्या कथित भ्रष्टाचारावर लक्ष केंद्रित करूनही १२८ पैकी ८४ जागा मिळवल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (NCP) ३७ जागा जिंकल्या. NCP मधील अंतर्गत संघर्ष आणि भाजपच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याने निकालात योगदान मिळाले.