विश्वास मोरे
पिंपरी : काँग्रेसमध्ये बंड झाले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली. त्यानंतर २००२ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांमध्ये लढत होऊन राष्ट्रवादीला अधिक जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचा महापौर झाला, तर उपमहापौरपद काँग्रेसकडे गेले. प्रकाश रेवाळे राष्ट्रवादीचे पहिले महापौर झाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९८६ पासून काँग्रेसमध्ये शरद पवार, अजित पवार आणि प्रा. रामकृष्ण मोरे, असे दोन गट होते. पुढे १९९९ मध्ये काँग्रेस फुटून शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यानंतर महापालिकेची पहिली निवडणूक झाली. राज्यात एकत्रित सत्ता असतानाही येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, भाजप, शिवसेना अशी लढत झाली होती.
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये २००१ च्या जनगणनेनुसार १० लाख ४० हजार लोकसंख्या होती. तर, १९९७ नंतर १४ गावे समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेची पहिली निवडणूक होती. त्यामुळे वार्डांची संख्या १०५ वर पोहोचली होती. ही निवडणूक तीन सदस्य पद्धतीने झाली. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये ३ सदस्य, असे एकूण ३५ प्रभाग निर्माण करण्यात आले.
प्रा. मोरे यांना शह देण्यात यशस्वी
या निवडणुकीमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यामध्ये वर्चस्वासाठी जोरदार चुरस झाली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ३६, काँग्रेसला ३३, शिवसेनेला ११, भाजपला १३ व अपक्षांना १२ जागा मिळाल्या. काँग्रेस एकत्र असताना पवारविरुद्ध मोरे गट सक्रिय होत. मात्र, १९९२ च्या निवडणुकीनंतर मोरे गटाचा प्रभाव कमी होत गेला. या निवडणुकीतही ३ सदस्य कमी होते. राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्याने महापौरपद राष्ट्रवादीकडे गेले आणि प्रकाश रेवाळे पहिले महापौर झाले.
असे होते प्रमुख प्रश्न
या निवडणुकीमध्ये समाविष्ट गावांचा विकास आराखडा, वाढती नागरीकरण यादृष्टीने नियोजन, अनधिकृत बांधकामे नियमीतीकारण, प्राधिकरणाचा साडेबारा टक्के परतावा आणि झोपडपट्टी पुनर्वसन, रस्ते विकास, पाणीपुरवठा, आरोग्य अशा प्रमुख समस्या होत्या. अर्थात स्थानिक मुद्द्यांवरही निवडणूक लढवली गेली, त्याचबरोबर समाविष्ट गावाचा विकास आणि निधी यावर लक्ष केंद्रित केले गेले.
या नेत्यांच्या झाल्या सभा
निवडणुकीच्या काँग्रेसचे सर्व राष्ट्रीय नेते उतरले होते. त्याचबरोबर प्रचारामध्ये केंद्रीय मंत्री शरद पवार, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, भाजपचे नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारखे नेते उतरले होते आणि त्यांच्या सभा झाल्या होत्या. या सभा गाजल्या होत्या.
यांना मिळाली होती संधी
या निवडणुकीमध्ये लक्ष्मण जगताप, श्रीरंग बारणे, संजोग वाघेरे, मंगला कदम, उमा खापरे, योगेश बहल, प्रशांत शितोळे, अमृत पऱ्हाड, नवनाथ जगताप, मधुकर पवळे, आझम पानसरे, अण्णा बनसोडे, भाऊसाहेब भोईर, विलास लांडे, मोहिनी लांडे, भाजपचे नेते अंकुशराव लांडगे, नारायण बहिरवडे, शिवसेनेचे नेत्या सुलभा उबाळे, असे अनेक नेते निवडून आले होते.
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रथमच २००२ ची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण नागरी प्रश्न होते. कारण, प्रा. रामकृष्ण मोरे विरुद्ध अजित पवार, असा थेटपणे राजकीय सामना झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचा महापौर झाला. उपमहापौर काँग्रेसला गेले होते.- गौतम चाबुकस्वार, माजी उपमहापौर