Pimpari-chinchwad : थेरगाव परिसरात पवना नदीत भराव, महापालिकेचे दुर्लक्ष
By विश्वास मोरे | Updated: September 13, 2025 11:45 IST2025-09-13T11:44:26+5:302025-09-13T11:45:45+5:30
- उंची वाढल्यास पुराचे पाणी चिंचवडगाव परिसरात शिरण्याचा धोका : पिंपरी-चिंचवड शहरात रावेतपासून दापोडीपर्यंत वाहणाऱ्या नदीची अवस्था दयनीय

Pimpari-chinchwad : थेरगाव परिसरात पवना नदीत भराव, महापालिकेचे दुर्लक्ष
पिंपरी : औद्योगिक नगरीची जीवनदायिनी असणाऱ्या पवना नदीचा गळा आवळण्याचे काम सुरू आहे. थेरगाव परिसरात नदीलगत मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकण्यात येत आहे. त्यामुळे थेरगावच्या बाजूने उंची वाढल्यास पुराचे पाणी चिंचवडगाव परिसरात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून पवना नदी वाहते. रावेतपासून दापोडीपर्यंत वाहणाऱ्या या नदीची अवस्था दयनीय आहे. जल प्रदूषण वाढले आहे. शहराच्या मध्य भागातून २४.५ किलोमीटरचे पात्र आहे. या परिसरात नदीचे पात्र अरुंद होऊ लागले आहे. चिंचवड, थेरगाव परिसरात नदीपात्रामध्ये राजरोस भराव टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पोच्या माध्यमातून शहरातील विविध भागांत तयार होणारा राडारोडा थेट नदीपात्रात आणून टाकला जात आहे. आरएमसी प्लांटमधील शिल्लक राहणारे सिमेंटही आणून टाकले जाते.
किवळेपासून दापोडीपर्यंत वाहणाऱ्या पवना नदीपात्रामध्ये रात्रीच्या वेळी राडारोडा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. थेरगावकडून चिंचवडकडे जाणाऱ्या पुलाच्या लगत वाल्हेकरवाडीच्या बाजूने नदीपात्रालगतच्या जमिनीची भराव टाकून उंची वाढविण्यात आली आहे. काळेवाडीकडून चिंचवड गावातून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दर्शननगरीच्या बाजूने असणाऱ्या नदीलगत दोन्ही बाजूंनी भराव टाकून उंची वाढविण्यात येत आहे.
चिंचवडगातून थेरगावकडे जाण्यासाठी मोरया गोसावी मंदिराकडून रस्ता आणि छोटा पूल आहे. त्या बाजूने राडारोडा टाकला जात आहे. तिथे नदीकाठची उंची वाढविली जात आहे. त्याचबरोबर नवीन बास्केट पूल उभारला आहे. तिथे थेरगावच्या बाजूने मोकळा प्लॉट असून, डबर टाकून उंची वाढविली आहे. बिर्ला हॉस्पिटलजवळील पुलापासून नवीन बास्केट पुलापर्यंत उंची वाढल्यास पुराचे पाणी चिंचवड गावठाणमध्ये शिरण्याचा धोका आहे.
रात्रीच्या वेळी टाकला जातोय भराव
महापालिकेच्या वतीने नदीपात्रात भराव टाकणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे, पर्यावरण विभागाने यावर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, आता रात्रीच्या वेळी राडारोडा आणून नदीपात्रात टाकला जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे. आता नदीचा गळा आवळण्याचा प्रकार सुरू आहे. कठोर कारवाई करण्याची गरज आहे. - सूर्यकांत मुथीयान, ज्येष्ठ पर्यावरणवादी