हल्ला पहलगाममधील पर्यटकांवर, फटका उद्योगनगरीतील टूर्स-ट्रॅव्हल्स व्यवसायाला; पर्यटकांच्याही खिशाला झळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 10:18 IST2025-04-25T10:14:26+5:302025-04-25T10:18:10+5:30
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद : काहींचे सुट्ट्यांमधील बेत रद्द, तर काहींनी सहली पुढे ढकलल्या;

हल्ला पहलगाममधील पर्यटकांवर, फटका उद्योगनगरीतील टूर्स-ट्रॅव्हल्स व्यवसायाला; पर्यटकांच्याही खिशाला झळ
पिंपरी : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरातील अनेकांनी सुट्ट्यांमधील पर्यटनाचे बेत रद्द केले आहेत. त्यामुळे टूर्स-ट्रॅव्हल्स व्यवसायातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. हल्ला पहलगामला झाला असला, तरी त्याची धग टूर्स-ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना आणि बुकिंग करणाऱ्यांना जाणवू लागली आहे.
पिंपरी-चिंचवड कामगारनगरी असून येथून उन्हाळा आणि दिवाळीच्या सुटीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी देश-परदेशात जात असतात. उन्हाळी सुटीमध्ये थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास कुटुंबांचे प्राधान्य असते. त्यानुसार तीन ते सहा महिने अगोदर टूर्स-ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या किंवा व्यक्तिगत स्वरूपाच्या पॅकेजचे आरक्षण केले जाते. हॉटेल्स, रेल्वे-विमान-बस किंवा वाहनांचे आरक्षण केले जाते.
एप्रिल-मे-जून महिन्यांतील काश्मीरचे बेत रद्द
फेब्रुवारी ते जून या चार महिन्यांमध्ये पिंपरी-चिंचवडमधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक देशांतर्गत पर्यटनास प्राधान्य देतात. जम्मू-काश्मीर, श्रीनगर, कुलू, मनाली, उटी, कोडाईकॅनाल, कुर्ग, मुन्नार अशा थंड हवेच्या ठिकाणी जात असतात. त्याचबरोबर वैष्णोदेवी, अमरनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ, तिरुपती या तीर्थस्थळी जाण्याचेही नियोजन केले जाते. आता पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागरिकांनी जम्मू-काश्मीरचे बुकिंग रद्द करण्यास, पुढे ढकलण्यास सुरुवात केली आहे, असे टूर्स-ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी सांगितले.
ग्रुप बुकिंगही होईना
शहर परिसरामध्ये निगडी, चिंचवड, पिंपरी, पिंपळे सौदागर, वाकड आणि भोसरी परिसरात सुमारे ३० लहान-मोठे टूर्स-ट्रॅव्हल्स व्यावसायिक आहेत. नामांकित टूर्स कंपन्यांच्याही शाखा आहेत. काश्मीरसाठी या कंपन्यांकडून सहल आयोजित केली जाते. वैयक्तिक बुकिंग केले जातेच, पण काश्मीरसाठी ग्रुपने बुकिंग करण्यावर भर दिला जातो. हे बुकिंग आता रद्द करण्यात येऊ लागले आहे.
नुकसान व्यावसायिक आणि ग्राहकांचे
आगाऊ आरक्षण केले की विमान तिकीट आणि हॉटेल पॅकेजमध्ये सवलत मिळत असते. यासाठी तीन ते सहा महिने अगोदर आरक्षण केले जाते. मात्र आता ऐनवेळी पर्यटनाचा बेत रद्द केल्याने टूर्स-ट्रॅव्हल्स व्यावसायिक आणि ग्राहकांचे नुकसान होत आहे. दोघांनाही आर्थिक फटका बसू लागला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून साधारणपणे या चार महिन्यांमध्ये एका कंपनीतून चारशे ते पाचशे पर्यटक थंड हवेच्या ठिकाणांसह देशात आणि परदेशात फिरायला जाण्याचे नियोजन करीत असतात. गेल्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर नागरिक काश्मीरला गेले होते. बुधवारी आमचा एक ग्रुप जाणार होता, तो रद्द झाला आहे. काश्मीरच्या सर्वच सहली रद्द झाल्या आहेत. आम्हाला मिळणारे उत्पन्न बुडाले आहे, तर काहींनी दौऱ्यांची ठिकाणे बदलली आहेत. - सुयोग सपकाळ, ट्रॅव्हल व्यावसायिक.
दहशतवादी हल्ल्यामुळे आमचेही नुकसान झाले आहे. आम्ही टूर्स-ट्रॅव्हल्स कंपनीकडून फिरण्यासाठी गेलो होतो. मात्र, ऐनवेळी सहल रद्द केली. यात आमचे आर्थिक नुकसान झाले आहे. जेवण व प्रवासाचा अतिरिक्त खर्च आम्हालाच करावा लागला आहे. - शैलेश बोरसे, वाकड.