पिंपरीतील संतापजनक घटना! तरुणीच्या अंगावर ओतले मिरचीचे पाणी
By नारायण बडगुजर | Updated: July 31, 2022 18:26 IST2022-07-31T18:26:09+5:302022-07-31T18:26:18+5:30
विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरीतील संतापजनक घटना! तरुणीच्या अंगावर ओतले मिरचीचे पाणी
पिंपरी : गैरवर्तन करणाऱ्या तरुणांना विरोध केल्याने तरुणीच्या अंगावर मिरची पावडरचे पाणी ओतले. त्यांनतर तिचा विनयभंग केला. याप्रकरणी दोन तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यातील एका तरुणाला अटक केली. चिखली गावठाण येथे शनिवारी (दि. २९) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
कृष्णा भाऊ मोरे (वय २७, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह कुणाल भंडारी याच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी २१ वर्षीय पीडित तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि आरोपी हे तोंड ओळखीचे आहेत. आरोपींनी तरुणीचा पाठलाग केला. तू आम्हाला आवडतेस, असे कृष्णा मोरे म्हणाला. त्यानंतर कुणाल भंडारी याने तरुणीला जवळ ओढत तिच्याशी गैरवर्तन केले. तिने विरोध केला असता भंडारी याने अंगावर मिरचीचे पाणी ओतले. तसेच गैरवर्तन केले. तू आमच्या विरोधात तक्रार केली तर तुला सोडणार नाही, अशी धमकीही आरोपींनी पीडितेला दिली. तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे.