फक्त अडीच हजारांसाठी मित्रानेच केला खून : पिंपरीतील एचए मैदानातील खुनाचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 18:54 IST2019-04-23T18:52:16+5:302019-04-23T18:54:38+5:30
बरेच दिवस उलटूनही अक्षयने ती रक्कम अजयला परत दिली नव्हती. यामुळे अजयने त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता.

फक्त अडीच हजारांसाठी मित्रानेच केला खून : पिंपरीतील एचए मैदानातील खुनाचा उलगडा
पिंपरी : पिंपरीतील हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स कंपनीच्या (एच ए) मैदानात दोन दिवसांपूर्वी झालेल्या तरूणाच्या खुनाचा छडा लावण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे. उसने घेतलेल्या अडीच हजार रूपयांवरून झालेल्या वादातून मित्रानेच त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
अक्षय दिनकर राऊत (वय २५, रा. गांधीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अजय राजेश नागोसे (वय १९, रा. गांधीनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. अजय आणि अक्षय हे दोघे मित्र होते. काही दिवसांपूर्वी अक्षय याने अजयकडून अडीच हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, बरेच दिवस उलटूनही अक्षयने ती रक्कम अजयला परत दिली नव्हती. यामुळे अजयने त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. दरम्यान, शनिवारी (दि. २१) रात्री आरोपी अक्षय आणि अजय हे सोबतच होते. ते पिंपरीतील नेहरुनगर येथील एच. ए. मैदानातून घरी निघाले होते. यावेळी त्यांच्यात पुन्हा पैशावरुन वाद झाला. अक्षय याने अजयच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू आणि दगड मारुन खून केला.
तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी अजयचा मृतदेह पेटवून पसार झाला. दरम्यान, पोलीस तपास करीत असताना मिळालेल्या माहितीनुसार अक्षयला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.