अरे बापरे ! तब्बल ८० कोटी रुपयांचे वीजबिल आकारून महावितरणने दिला शॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 18:52 IST2020-06-21T18:52:15+5:302020-06-21T18:52:40+5:30
लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या उद्योजकांना कंपन्या सुरू करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यातच विविध कारणांमुळे अनेकदा वीजपुरवठा खंडीत असतो. लॉकडाऊननंतर उद्योग सुरू केल्यावर देखील महावितरणचा कारभार सुधारत असल्याचे दिसून येत नाही.

अरे बापरे ! तब्बल ८० कोटी रुपयांचे वीजबिल आकारून महावितरणने दिला शॉक
पिंपरी : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे उद्योजकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. भोसरी येथील एका लघुउद्योगाचे एका महिन्याचे वीजबिल ८० कोटी आकारण्यात आले होते. मात्र चूक लक्षात आल्यानंतर महावितरण कंपनीच्या अधिका-यांनी दुरुस्ती करून देत ८४ हजार ९५० रुपये आकारल्याचे वीजबिल संबंधित उद्योजकाला दिले.
लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या उद्योजकांना कंपन्या सुरू करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यातच विविध कारणांमुळे अनेकदा वीजपुरवठा खंडीत असतो. लॉकडाऊननंतर उद्योग सुरू केल्यावर देखील महावितरणचा कारभार सुधारत असल्याचे दिसून येत नाही. वीजपुरवठा खंडीत झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहक महावितरण कंपनीच्या संबंधित शाखा कार्यालयात फोन करतात. मात्र त्याला प्रतिसाद दिला जात नाही, अशी तक्रार उद्योजकांकडून होत आहेत.
पिंपरी - चिंचवड लघुउद्योग संघटनेचे सभासद बाबू जॉन यांचा प्लास्टिक मोल्ड तसेच इंजिनियरिंगशी संबंधित लघुउद्योग आहे. भोसरी येथे प्राधिकरण हद्दीत पेठ क्रमांक दहामध्ये साई प्रोफाइल नावाने जॉन यांची कंपनी आहे. या कंपनीचे दरमहा एक ते दीड लाख रुपयांपर्यंत वीजबिल येते. महावितरणने मे महिन्यासाठी ८० कोटी रुपये वीजबिल आकारले. लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग ठप्प झाले. लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर उद्योग सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली. त्यामुळे उद्योग अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. त्यात लघुउद्योग सुरू करण्यात मोठ्या अडचणी आहेत. पुरेसे काम नसल्याने वीजवापर कमी होत आहे.
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संदीप बेलसरे याबाबत म्हणाले, संबंधित वीजबिलाबाबत महावितरणच्या शाखा अभियंत्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर वीजबिलात दुरुस्ती करून देण्यात आली. त्यानुसार ८४ हजार ९५० रुपये सुधारित वीजबिल देण्यात आले आहे. वीजवापर कमी होत असतानाही महावितरणच्या संबंधित विभागाला याचे भान असल्याचे दिसून येत नाही. महावितरणने प्रत्यक्ष वीज मीटरचे रीडिंग घेऊन बिल दिले पाहिजे. त्यामुळे अश्या चुका होणार नाहीत.
लघुउद्योजक बाबू जॉन म्हणाले, ‘‘दरमहिन्याला एक ते दीड लाख रुपयांपर्यंत वीजबिल येते. मे महिन्याचे वीजबिल मला रविवारी मिळाले. ते ८० कोटींपर्यंत होते. ते बिल पाहून मी हबकलो. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मोठा मनस्ताप झाला.’’
तांत्रिक कारणांमुळे विजबिलावर चुकीची रक्कम नमूद झाली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर लागलीच त्यात सुधारणा करण्यात आली. संबंधित ग्राहकास दुरुस्ती केलेले विजबिल देण्यात आले आहे.
- राहुल गवारे, कार्यकारी अभियंता, महावितरण, भोसरी शाखा