पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व बालवाड्यांमध्ये आता एकच अभ्यासक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 14:21 IST2022-11-16T14:20:49+5:302022-11-16T14:21:32+5:30
काय असणार आहे या अभ्यासक्रमात?....

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व बालवाड्यांमध्ये आता एकच अभ्यासक्रम
पिंपरी : शहरातील सर्व बालवाड्यांमध्ये आता एकच अभ्यासक्रम असेल, बालवाडी शिक्षणामध्ये एकवाक्यता असावी, सर्वांना हसत- खेळत शिक्षण मिळावे, असा यामागचा उद्देश आहे. याकरिता महापालिकेसोबत आकांक्षा फाउंडेशन, विपला फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा आकार, ग्राममंगल उपक्रम यांचा अंतर्भाव असलेला अभ्यासक्रम यात असणार आहे. यामध्ये उपक्रमशील शिक्षकांची आणि सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. पिंपरी- चिंचवड स्तरावर हा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे.
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या बालवाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थीसंख्या चांगली असून, आणखी बालवाड्या वाढवाव्या, अशी पालकांची मागणी आहे. सध्या पिंपरी- चिंचवड शहरात एकूण २०४ बालवाड्या कार्यरत आहे. तर चार पर्यवेक्षक असून दाेन पदे निवृत्तीमुळे रिक्त आहेत. या बालवाड्यांमध्ये शहरातील ६,७५० मुले शिक्षण घेत आहेत. बालवाडी ही शिक्षणाची पहिली पायरी मानली जाते. अभ्यासाचा पाया पक्का होण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा असतो. त्यामुळे बालवाडीत योग्य शिक्षण मिळायला हवे. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने योग्य असे हसत- खेळत शिक्षण मुलांना मिळावे, यासाठी पालिका तत्पर असल्याने आता अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे.
काय असणार आहे या अभ्यासक्रमात?
मुलांना शिक्षण देताना हसत- खेळत शिक्षण दिले तर ते मनापासून आत्मसात करतील. यामध्ये मुलांचा शैक्षणिक बरोबरच भावनिक विकासदेखील पाहिला जाणार आहे. बालमानसशास्त्राचा विचार करून मुलांचा विकास करण्यावर भर असणार आहे. विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षणावर लक्ष देत आनंददायी शिक्षण असण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. प्रत्येक विषय शिकवताना गाणी, गोष्टी, मुलांची मानसिकता आवड यांचा विचार केला जाणार आहे.
शहरातील उपक्रमशील शिक्षक, सामाजिक संस्था यांची मदत घेऊन हा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता विचारात घेत हसत- खेळत अभ्यासावर भर असणार आहे. बालवाड्यांमध्ये मुलांना गाणी, गोष्टी शिकवल्या जातात. मात्र, अनेकदा त्या मुलांची मानसिकता विचारात घेतली जातेच असे नाही. त्यामुळे या मुलांच्या बौद्धिक, शारीरिक क्षमतेचा विचार या अभ्यासक्रमात केला जाणार असल्याने अभ्यासक्रमाचा चांगला फायदा सर्व मुलांना होईल.
- संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, महापालिका