कुटुंबीयांच्या सुरक्षेची नाही हमी; ६० सदनिकांपैकी ५२ घरे रिकामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 14:14 IST2025-07-19T14:14:13+5:302025-07-19T14:14:47+5:30
- देहूरोड पोलिस वसातीमधील इमारतींची दयनीय अवस्था; केवळ आठ कुटुंबे वास्तव्यास

कुटुंबीयांच्या सुरक्षेची नाही हमी; ६० सदनिकांपैकी ५२ घरे रिकामी
- नारायण बडगुजर
पिंपरी : राहण्यायोग्य नसल्याने देहूरोड पोलिस वसाहतीमधील घरे वापराविना पडून आहेत. जुन्या पद्धतीचे बांधकाम आणि लहान घरे (वन आरके) असल्याने गेल्या काही वर्षांत पोलिस कुटुंबांनी या वसाहतीमधून इतरत्र राहण्यास जाणे पसंत केले आहे; तसेच वसाहतीला सीमाभिंत नसल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
देहूरोड पोलिस वसाहतीत तीन मजली पाच इमारती आहेत. ३५ वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या या वसाहतीत ६० घरे असून, सध्या केवळ आठ कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यामुळे ५२ घरे वापराविना कुलूपबंद आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १९८५ मध्ये वसाहतीची उभारणी सुरू झाली होती. इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन १९८९ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस दलाकडे ही घरे हस्तांतरित केली होती. देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाते; मात्र बांधकाम जुने असल्याने इमारती जीर्ण झाल्या आहेत. पाऊस जास्त प्रमाणात होत असल्याने छताला गळती होते. तसेच भिंतीमधून पाणी घरात येते. त्यामुळे पावसाळ्यात घरांमध्ये पाणी येते. पोलिसांच्या कुटुंबीयांना गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
तावदाने दुरवस्थेत
इमारतीच्या खिडक्या जुन्या पद्धतीच्या आहेत. काचा फुटल्या आहेत. तर काही खिडक्या मोडकळीस आल्या आहेत. खिडक्यांची तावदाने देखील दुरवस्थेत आहेत. त्यावर गवत उगवलेले आहे. काही ठिकाणी पडझड झाली आहे. काही तावदाने पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे धोकादायक झाली आहेत.
प्लास्टर, काँक्रीट पडल्याने पिलर धोकादायक
काही ठिकाणी इमारतींच्या पिलरचे प्लास्टर आणि काँक्रीट पडले आहे. त्यामुळे पिलर धोकादायक झाले आहेत. त्यामुळे इमारतींच्या दुरवस्थेत भर पडली आहे. काही घरांतील भिंतींचेही प्लास्टर निघाले आहे.
तारेचे कुंपण तुटल्याने समस्या देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत पुणे-मुंबई महामार्गावर सेंट्रल चौकालगत ही पोलिस वसाहत आहे. येथेच पोलिस ठाणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा बंगला, गुन्हे शोखेचे युनिट पाच, पोलिस विश्रांतिगृह, तसेच देहूरोड वाहतूक विभागाचे कार्यालय देखील येथेच आहे. येथे तारेचे कुंपण आहे. मात्र, तुटलेल्या तारांमुळे कुंपण असून नसल्यासारखेच आहे. मोकाट जनावरे, भटके श्वान यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे पोलिस वसाहत परिसरात घाण होत आहे.
महामार्गावरच्या दुचाकी पोलिस वसाहतीत
पुणे-मुंबई महामार्गावरून देहूरोड येथून सेंट्रल चौक मार्गे तळेगाव दाभाडेकडे जाणाऱ्या दिशेला सेंट्रल चौकात नेहमी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वाहनांच्या या रांगांमध्ये जाण्याऐवजी दुचाकीस्वार त्यांच्या दुचाकी पोलिस वसाहतीतून दामटतात. पोलिस ठाण्याच्या समोरून देहूरोड वाहतूक विभागाच्या कार्यलयाजवळून सेंट्रल चौकात या दुचाकी जातात. तारेचे कुंपण तुटलेले असल्याने महामार्गावरील दुचाकी पोलिस वसाहतीत येतात.
गवत अन् झुडपे
पावसाचे प्रमाण जास्त असल्याने परिसरात गवत आणि झुडपे जास्त आहेत. इमारतींच्या भिंतीवर, तसेच छतावर आणि पाण्याच्या टाकीवर देखील गवत आणि झुडपे उगवलेली आहेत. पाण्याच्या टाकीला गळती आहे. तसेच इंजिन घराची दुरवस्था झाली आहे.
आम्ही कुठे जायचे?
वसाहतीमधील पोलिस कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. हा परिसर म्हणजे आमचा गाव आहे, आमची मुले येथेच लहानाची मोठी झाली. त्यामुळे आता हा परिसरात सोडून इतरत्र जाण्याची इच्छा होत नाही. शासकीय घरे सोडून आम्ही कुठे जायचे? येथे सोयीसुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. आता केवळ आठ कुटुंबे वास्तव्यास आहेत. सोयीसुविधा उपलब्ध न झाल्यास राहण्यासाठी इतरत्र जावे लागेल, असे रहिवासी पोलिस कुटुंबीयांनी सांगितले.