राष्ट्रवादी काँग्रेसनं पिंपरी चिंचवड मनपावर काढला 'जवाब दो मोर्चा', भाजपाविरोधात व्यक्त केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 14:37 IST2017-11-09T12:50:48+5:302017-11-09T14:37:01+5:30
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन 8 महिने झाले आहेत. विरोधकच नव्हे तर भाजपाचे पदाधिकारीदेखील पालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आहेत. आठ महिन्यात स्मार्ट, बेस्ट सिटीची वाट लागली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी 'महापालिका जवाब दो' असा नारा देत मोर्चा काढला.

राष्ट्रवादी काँग्रेसनं पिंपरी चिंचवड मनपावर काढला 'जवाब दो मोर्चा', भाजपाविरोधात व्यक्त केला निषेध
पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन 8 महिने झाले आहेत. विरोधकच नव्हे तर भाजपाचे पदाधिकारीदेखील पालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आहेत. आठ महिन्यात स्मार्ट, बेस्ट सिटीची वाट लागली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी 'महापालिका जवाब दो' असा नारा देत मोर्चा काढला.
राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, युवा नेते नाना काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात कच-याचे साम्राज्य आहे. नागरिकांना साधे मुबलक पाणीदेखील मिळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात स्वच्छतेबाबत राज्यात पहिले व देशात नवव्या क्रमांकावरअसलेले शहर भाजपाच्या काळात शेवटच्या क्रमांकावर फेकले गेले आहे. पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यांत निगडीपर्यंत नेणे गरजेचे असताना भाजपाचे पदाधिकारी त्यावर ठोस बोलत नाहीत. बीआरटीएसचे अनेक प्रकल्प रखडले आहेत,असा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. ''शास्तीकर, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न प्रलंबित आहे. रिंगरोड बाधित नागरिक भयभित आहेत. शहरात एकही मोठे विकासाचे काम सुरू नाही. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली’खाबूगिरी’ सुरु आहे. पारदर्शी काम, कधी लागणार भ्रष्टाचाराला लगाम,आश्वासने नको उत्तर हवे'', अशा बॅनरखाली राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेवर ‘जवाब दो’ मोर्चा काढला.