महापालिकेच्या फिरत्या शौचालयाचे दरवाजे चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 20:59 IST2018-08-07T20:52:45+5:302018-08-07T20:59:29+5:30
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फिरत्या शौचालय गाडीतील चौदा लोखंडी दरवाजे चोरून नेले आहेत.

महापालिकेच्या फिरत्या शौचालयाचे दरवाजे चोरीला
पिंपरी चिंचवड : चोर काय चोरीतील याची काही खात्री नाही या वाक्याशी सुसंगत घटनेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात डाळीची पिशवी चोरी झाल्याची घटना जुनी होत नाही तोच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फिरत्या शौचालय गाडीतील चौदा लोखंडी दरवाजे चोरून नेले आहेत. याबाबत वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फिरत्या शौचालयाचे सुमारे चौदा लोखंडी पत्र्याचे दरवाजे अज्ञात व्यक्तीने चोरले आहेत. चार ऑगस्ट २०१८ ते सहा ऑगस्ट २०१८ या दोन दिवसात हा प्रकार घडला.ही गाडी थेरगाव भागातील जगताप नगरमधील महापालिकेच्या मोकळ्या जागेत लावली होती.त्यानंतर महापालिका कर्मचारी गाड्या हलवण्यासाठी गेले असताना त्यांना दरवाजे चोरीला गेल्याचे लक्षात आले. हे दरवाजे २८ हजार रुपये किंमतीचे होते. या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आला आहे.