प्रदूषण करणाऱ्यांवर करडी नजर; पर्यावरणहानी रोखण्यासाठी महापालिकेकडून खासगी संस्थेची नेमणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:21 IST2025-02-15T12:20:54+5:302025-02-15T12:21:06+5:30
महापालिका हद्दीमध्ये नागरिक रस्त्यांच्या कडेला, नदी-नाल्यांच्या कडेला अनधिकृत भराव व बांधकामाचा राडारोडा टाकतात.

प्रदूषण करणाऱ्यांवर करडी नजर; पर्यावरणहानी रोखण्यासाठी महापालिकेकडून खासगी संस्थेची नेमणूक
पिंपरी : शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा, राडारोडा, प्लास्टिक टाकणाऱ्यांवर, आरएमसी प्लॉटमधून हवेचे प्रदूषण, बांधकामाच्या ठिकाणी कर्कश आवाज करणाऱ्यांवर महापालिका वॉच ठेवणार आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर पालिका चोवीस तास करडी नजर ठेवणार आहे. त्यासाठी दोन खासगी संस्थांची नेमणूकही महापालिकेने केली आहे.
महापालिका हद्दीमध्ये नागरिक रस्त्यांच्या कडेला, नदी-नाल्यांच्या कडेला अनधिकृत भराव व बांधकामाचा राडारोडा टाकतात. सार्वजनिक ठिकाणी घनकचरा टाकणे, परिसर अस्वच्छ ठेवणे, रस्ते पदपथावर घाण-कचरा करणे तसेच लहान उद्योजक कारखानदार सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात किंवा नदीपात्रात सोडतात. या सर्व कारणांमुळे महापालिका परिसरात अस्वच्छता पसरते. परिणामी पर्यावरणाची हानी होते.
महापालिकेमधील बांधकाम व्यवस्थापन २०१६, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६, बांधकाम राडा रोडा मार्गदर्शन तत्त्वे, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन मार्गदर्शन तत्त्वे, ई- कचरा व्यवस्थापन नियम २०२२, प्लास्टिक व्यवस्थापन नियम २०२२ इत्यादी नियम व अधिनियमानुसार खासगी संस्थेमार्फत ही कारवाई करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोणत्याही प्रकारे पर्यावरणास हानिकारक कृती करत असाल, तर महापालिकेच्या निश्चित धोरणानुसार नागरिक, कारखानदार, बिल्डर यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईही केली जाईल. - संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका