Monthly review meeting to improve school quality | शाळा दर्जा सुधारण्यासाठी महिन्याला आढावा बैठक
शाळा दर्जा सुधारण्यासाठी महिन्याला आढावा बैठक

देहूरोड : कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेचा शैक्षणिक दर्जा आणखी सुधारावा यासाठी योग्य नियोजन करण्यासह कामकाज करताना शिक्षक व प्रशासन यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी आता प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी बोर्ड पदाधिकारी, प्रशासन व शिक्षक यांची संयुक्त आढावा बैठक घेतली जाणार आहे.

बोर्डाच्या वतीने आयोजित लोकप्रतिनिधी व बोर्डाच्या सर्व शाळांतील शिक्षक यांच्या सहविचार सभेत कॅन्टोन्मेंटच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष विशाल खंडेलवाल बोलत होते. त्या वेळी त्यांनी प्रत्येक महिन्याला संयुक्त आढावा बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस बोर्डाच्या उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे, सदस्य ललित बालघरे, कार्यालय अधीक्षक पंढरीनाथ शेलार, सर्व शिक्षा अभियानप्रमुख श्रीकांत पतके, महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सितारा मुलाणी, तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यम प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. खंडेलवाल म्हणाले, ‘‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांनी प्राधान्य द्यावे. कॅन्टोन्मेंटकडून सर्व भौतिक सुविधा पुरवण्यात येतील. शिक्षकांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. शिक्षकांनी अडचणींबाबत लेखी सूचना द्याव्यात. जेणेकरून प्रशासनाकडून तातडीने घेण्यात येतील. या वर्षीपासून विद्यार्थ्यांना गणवेशासह दप्तर व रेनकोट देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.’’

महात्मा गांधी विद्यालयात इंटरनेट सुविधा नसल्याची बाब मुख्याध्यापिका मुलाणी यांनी निदर्शनास आणताच दोन दिवसांत ती उपलब्ध करण्याबाबत सूचना खंडेलवाल यांनी केली. मुलींना व शिक्षिकांना स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी एका शिक्षिकेने केली. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत सांगण्यात आले. कार्यालय अधीक्षक शेलार यांनी प्रास्तविक केले. संजय तापकीर यांनी सूत्रसंचालन केले. सिकंदर मुलाणी यांनी आभार मानले.

सभेत देण्यात आलेल्या सूचना
दहावीचा निकाल चांगला लागण्यासाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यावी.
दरमहा शेवटच्या शनिवारी संयुक्त आढावा बैठक आयोजित करावी.
शाळांसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य, स्टेशनरी आदी संभाव्य खर्चाची यादी सादर करावी.
शाळांतील खर्चाचा तपशील बोर्डाकडे सादर करावा.
सर्व शाळांचे एकत्रित स्नेहसंमेलन व विज्ञान प्रदर्शन याबाबत सविस्तर माहिती द्यावी.
शैक्षणिक कार्यक्रम घेण्यापूर्वी शिक्षण समिती अध्यक्षांना पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे.

सभेतच शिक्षकेला रडू कोसळले
सहविचार सभेत महात्मा गांधी विद्यालयातील दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत माहिती विचारण्यात आली असता दहावीच्या वर्गातील काही मुले त्रास देत असल्याचे सांगत एका विषय शिक्षकेला अक्षरश: रडू कोसळले. याबाबत खंडेलवाल यांनी तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याबाबत कार्यालय अधीक्षक शेलार यांना सूचना केल्या.

Web Title: Monthly review meeting to improve school quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.