दोनशे रुपये देऊन अत्याचार; १२ वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गरोदर

By नारायण बडगुजर | Updated: May 23, 2024 21:16 IST2024-05-23T21:16:31+5:302024-05-23T21:16:43+5:30

पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी १९ मे रोजी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

minor girl abused and molested by giving two hundred rupees; now girl is six months pregnant | दोनशे रुपये देऊन अत्याचार; १२ वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गरोदर

दोनशे रुपये देऊन अत्याचार; १२ वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गरोदर

पिंपरी : मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीला २०० रुपयांचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात नेले असता मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. निगडी येथे डिसेंबर २०२३ मध्ये हा प्रकार घडला.  

सुलतान शेख (३०, रा. निगडी ओटास्कीम), असे अटक केलेल्याचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी १९ मे रोजी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलिस आयुक्त राजू मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलतान शेख हा रिक्षा चालक आहे. ताे भाडेतत्त्वारील रिक्षा चालवतो. पीडित मुलगी तिच्या कुटुंबियांसह चिंचवड परिसरात वास्तव्यास आहे. पीडित मुलगी तिच्या निगडी येथील मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली असता सुलतान शेख याने रिक्षातून तिला घरी सोडण्याचा बहाणा केला. त्यातून तिच्याशी ओळख केली. त्यानंतर वेगवेगळ्या तीन ठिकाणी नेले. तिला २०० रुपये देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातून मुलगी गरोदर राहिली. दरम्यान तिला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात नेले. त्यावेळी ती सहा महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. 


न्यायालयीन कोठडी
गुन्हा दाखल करून सुलतान शेख याला २० मे रोजी पोलिसांनी अटक केली. त्याला गुरुवारपर्यंत (दि. २३) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. 

पीडितेवर उपचार सुरू 
पीडित मुलीचे आईवडील मजुरी करतात. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तिला १७ वर्षांचा भाऊ असून तिच्यापेक्षा आणखी दोन लहान भावंडे आहेत. पीडितेला मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पोलिसांनी प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी पीडितेच्या नावाने बँकेत खाते काढण्यात येणार आहे.

Web Title: minor girl abused and molested by giving two hundred rupees; now girl is six months pregnant