अचानक लिफ्ट थांबली अन् संपूर्ण कुटुंब अडकले; अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 21:24 IST2025-02-03T21:20:54+5:302025-02-03T21:24:48+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर

Lift suddenly stops in Pimpri entire family trapped | अचानक लिफ्ट थांबली अन् संपूर्ण कुटुंब अडकले; अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर

अचानक लिफ्ट थांबली अन् संपूर्ण कुटुंब अडकले; अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर

नारायण बडगुजर

पिंपरी : अचानक लिफ्टमध्ये अडकलेल्या एकाच कुटुंबातील चौघांची सुखरूप सुटका केली. अग्निशामक दलाच्या जवानांनी चौघांना सुखरुप बाहेर काढले. निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २४ येथील अँटेला व्हिस्टा हाउसिंग सोसायटीत रविवारी (दि. २) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

निक्सेन आगस्टिन (वय ४९, परिणीता निक्सेन (४३), जेसन निक्सेन (११) आणि क्रिस्टेना निक्सेन (८, सर्व रा. अँटेला व्हिस्टा, सेक्टर २४, प्राधिकरण निगडी) असे लिफ्टमधून सुखरुप बाहेर काढलेल्यांची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाचे सारंग मंगरुळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरणातील अँटेला व्हिस्टा या साेसायटीत काही जण लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. त्यानुसार अग्निशामकच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. निक्सेन आगस्टिन यांच्यासह त्यांची पत्नी परिणीता, मुलगा जेसन आणि मुलगी क्रिस्टेना हे चौघे लिफ्टमध्ये अडकल्याचे दिसून आले. इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या मध्यभागी लिफ्ट थांबली होती. लिफ्टमध्ये अडकलेली जेसन व क्रिस्टेना हे दाेघे घाबरलेले होते. तुम्हाला आम्ही सुखरुप बाहेर काढू, असे सांगून अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना धीर दिला. जवानांनी कोब्रारच्या साह्याने लिफ्टचा दरवाजा उघडला. त्यानंतर लिफ्टच्या वरच्या बाजूने सुरुवातीला क्रिस्टेना आणि जेसन यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांची आई परिणीता आणि वडिल निक्सेन यांना बाहेर काढले.

महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख अग्निशामक विमोचक मिलिंद पाटील, वाहनचालक लक्ष्मण बंडगर, प्रशिक्षणार्थी फायरमनसुशील चव्हाण, सागर वाघमारे, मयूर सुक्रे, सोहम कांबळे, गणेश ननावरे यांनी ही कामगिरी केली.

अग्निशामक दलाच्या जवानांचे काैतुक

लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर निक्सेन आणि त्यांच्या कुटुंबाने अग्निशामकच्या जवानांचे आभार मानले. तसेच नागरिकांनी टाळ्या वाजवत अग्निशामक विभागाच्या जवानांचे कौतुक केले.

आम्ही लिफ्टमध्ये गेल्यानंतर अचानक लिफ्ट बंद झाली. त्यामुळे आम्ही खूप घाबरलो. त्यामुळे मी सोसायटीतील लोकांना मदतीसाठी आवाज दिला. अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यांनी आम्हाला सुखरुप बाहेर काढले.

- निक्सेन आगस्टिन, प्राधिकरण निगडी

Web Title: Lift suddenly stops in Pimpri entire family trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.